Video-फटाक्यांऐवजी 'या' परिवारानं गोळीबार करत साजरी केली दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:05 PM2018-11-13T14:05:13+5:302018-11-13T14:05:24+5:30
दिल्लीच्या नोएडामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे
नोएडा- दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु तरीही परिस्थितीत फार काही सुधारणा होताना पाहायला मिळत नाही आहे. फटाके फोडल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे श्वास घेणं मुश्कील झालं आहे. याच दरम्यान दिल्लीच्या नोएडामध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये गोळीबार करत दिवाळी साजरी करत असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कुटुंबातील इतर सदस्यांना वारंवार हवेत गोळीबार करायला सांगतोय. तसेच त्याचं ऐकून महिला आणि लहान मुलेही गोळीबार करत आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडीओ नोएडातल्या हरोला गावातील असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हिडीओमधल्या शॉल घेऊन असलेल्या व्यक्तीचं नाव मनोज जैन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोजचा हरोला गावात व्यवसाय आहे.
@ndtvindia पटाखों पर प्रतिबंध,नोएडा के हरौला गांव में एक शख्स ने की परिवार के साथ रिवाल्वर से फायरिंग,मनाई दीवाली ! पुलिस मामले की जांच में लगी pic.twitter.com/zOQknDxkLi
— Mukesh singh sengar (@mukeshmukeshs) November 13, 2018
मनोज जैन गाडीत बसून लोकांना गोळीबार करायला सांगत होता. त्यानंतर लोक गोळीबारही करत होते. व्हायरल व्हिडीओमध्ये मनोज स्वतः गोळीबार करत असल्याचंही पाहायला मिळतंय. त्याला सरकारी नियमांची कोणतीही चिंता नसल्याचंही या व्हिडीओत दिसतंय. तसेच हा गोळीबार करत असलेला व्हिडीओ कुटुंबातीलच कोणी तरी बनवल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हिडीओत मनोजजवळ बंदुका असल्याचं पाहायला मिळतंय. पोलीस प्रकरणाचा तपास करत असून, मनोज दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.