बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले 26 लाख; पठ्ठ्याचा पैसे परत देण्यास नकार, काढली सर्वच रक्कम अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:28 AM2023-12-18T11:28:11+5:302023-12-18T11:28:34+5:30
तरुणाच्या खात्यावर रक्कम परत करताना तांत्रिक त्रुटीमुळे बँकेने 58 हजार रुपयांऐवजी 26 लाख 15 हजार 905 रुपये तरुणाच्या खात्यावर ट्रान्सफर केले.
नोएडामध्ये सायबर क्राईमची एक विचित्र घटना समोर आला आहे. येथे एका तरुणाची 58 हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. या तरुणाने पोलिसांत तक्रार केल्यावर बँकेने फसवणूक केलेली रक्कम फ्रीज केली. तरुणाच्या खात्यावर रक्कम परत करताना तांत्रिक त्रुटीमुळे बँकेने 58 हजार रुपयांऐवजी 26 लाख 15 हजार 905 रुपये तरुणाच्या खात्यावर ट्रान्सफर केले. ही रक्कम खात्यात येताच तरुणानेही शक्कल लढवली आणि संपूर्ण रक्कम काढून घेतली.
आता बँक व्यवस्थापनाने या तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बँक अधिकारी पंकज बांगर यांनी सांगितलं की, आरोपी तरुण नीरज कुमार याने सायबर क्राईम पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्याची 58 हजार रुपयांची फसवणूक झाली होती. अशा स्थितीत तक्रार येताच बँकेने या व्यवहाराची रक्कम फ्रीज केली.
तपासादरम्यान या प्रकरणाची पुष्टी झाली. यानंतर बँकेने फसवणूक झालेली रक्कम आरोपीच्या खात्यात परत केली. ही रक्कम नीरज कुमारच्या खात्यात परत केली जात असताना बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या आली आणि 58 हजार रुपयांऐवजी 26,15,905 रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर बँकेला ही चूक लक्षात आली. यानंतर तपास केला असता आरोपीने त्याच्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढल्याचं आढळून आलं.
आरोपी तरुणाने चेकद्वारे 13 लाख 50 हजार रुपये काढले, तर उर्वरित रक्कम त्याने ऑनलाइन पद्धतीने अन्य खात्यात ट्रान्सफर केली. या माहितीनंतर बँक व्यवस्थापनाने आरोपी तरुणाशी संपर्क साधून रक्कम परत करण्यास सांगितले, मात्र आरोपी तरुणाने स्पष्ट नकार दिला. यानंतर बँक व्यवस्थापनाने आरोपीविरुद्ध पैशांचा अपहार केल्याचा आरोप करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे.