अरेरे! १५ वर्षांच्या मुलीने दिलाय पोलिसांच्या डोक्याला ताप; १२ वर्षीय मुलासह तिसऱ्यांदा गेली पळून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 02:11 PM2024-10-14T14:11:39+5:302024-10-14T14:24:08+5:30
पोलीस सध्या एका १५ वर्षांच्या मुलीमुळे हैराण झाले आहेत. एक-दोनदा नाही तर ही मुलगी १२ वर्षांच्या मुलासोबत तिसऱ्यांदा पळून गेल्याची घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील पोलीस सध्या एका १५ वर्षांच्या मुलीमुळे हैराण झाले आहेत. एक-दोनदा नाही तर ही मुलगी १२ वर्षांच्या मुलासोबत तिसऱ्यांदा पळून गेल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही दोनदा पोलिसांनी या मुलीला शोधून घरी आणलं होतं. मुलीचं कुटुंबीय तिला इतकं कंटाळलं होतं की, ते शहर सोडून जाऊ लागले. मात्र त्याआधीच मुलगी पुन्हा एकदा १२ वर्षांच्या मुलासोबत पळून गेली.
दोघेही कुठे आहेत याचा अद्याप पत्ता नाही. हे प्रकरण नोएडातील सेक्टर-५८ मधील बिशनपुरा गावातील आहे. पुन्हा एकदा ही मुलगी घरातून पळून गेली. हे कुटुंब बिहारला परतत होतं. पण तेव्हा मुलगी घरात नव्हती. वडील ऑटो आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर आई आणि लहान बहिणीला फसवून मुलगी पळून गेली. कुटुंबीयांनी रडत रडत पोलीस ठाणं गाठलं. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची मदत मागितली.
हे कुटुंब मूळ बिहारमधील दरभंगा येथील आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी १५ वर्षांची तर धाकटी मुलगी १२ वर्षांची आहे. सुमारे ४ वर्षांपूर्वी ते नोएडा येथे आपल्या मुलींना चांगलं शिक्षण देण्यासाठी आले होते. बिशनपुरा येथे भाड्याने खोली घेतली. पती-पत्नी दोघेही खासगी कंपनीत नोकरी करून मुलींना शिकवत होते.
फेब्रुवारी २०२४ मध्ये मोठी मुलगी शेजारी राहणाऱ्या आणखी दोन अल्पवयीन मुलींना घेऊन गेली होती. आठवडाभरानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन वृंदावन येथून परत आणलं. तिने घरातून ५० हजार रुपये घेतले होते. जयपूरमध्ये फिरून ती वृंदावनला पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी १५ दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका १२ वर्षीय मुलासह बेपत्ता झाली होती. खूप प्रयत्नानंतर तिला शोधलं.
मुलीचे वडील कुटुंबासह दरभंगा येथे जाणार होते. ते ऑटो आणण्यासाठी बाहेर पडले होते. पत्नी आणि धाकटी मुलगी घरातील सामान बांधत असताना मोठी मुलगी गुपचूप निघून गेली. शेजारी राहणारा १२ वर्षीय मुलगाही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी ती या मुलाला सोबत घेऊन गेली आहे. एडीसीपी यांनी मुलीचा शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे अशी माहिती दिली.