सोईस्कर आकडेवारीद्वारे नोटाबंदीची भलामण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 02:28 AM2017-12-25T02:28:51+5:302017-12-25T02:29:02+5:30
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ‘जीडीपी’वर कोणताही विपरित परिणाम झाला नाही असे दाखविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने ‘सेंट्रल स्टॅटिस्टिकल आॅर्गनायझेन’च्या (सीएसओ) वरिष्ठ
अहमदाबाद : नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि ‘जीडीपी’वर कोणताही विपरित परिणाम झाला नाही असे दाखविण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने ‘सेंट्रल स्टॅटिस्टिकल आॅर्गनायझेन’च्या (सीएसओ) वरिष्ठ अधिका-यांवर दबाव आणून सोईस्कर अशी आकडेवारी (डेटा) तयार करून घेतली, असा आरोप भाजपाचे नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.
शनिवारी येथे चार्टर्ड अकाउंटंट््सच्या एका मेळाव्यात बोलताना डॉ. स्वामी म्हणाले की, कृपा करून अर्थव्यवस्थेशी संबंधित तिमाही आकडेवारीवर विश्वास ठेवू नका. ती पूर्णपणे बोगस असते. मी हे तुम्हाला अधिकारवाणीने सांगू शकतो कारण ‘सीएसओ’ची स्थापना माझ्या वडिलांनीच केलेली आहे.
स्वामी म्हणाले की, नोटाबंदीचे समर्थन करणारी ‘सीएसओ’ची आकडेवारी सरकारने लोकांपुढे मांडली तेव्हा मी निराश झालो. कारण नोटाबंदीने अर्थव्यवस्था आणि जीडीपीवर विपरित परिणाम झाला आहे, हे मला ठाऊक होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्यासोबत ‘सीएसओ’मध्ये जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी ‘सीएसओ’च्या संचालकांना त्यांनी नोटाबंदीच्या समर्थनार्थ संकलित केलेल्या आकडेवारीविषयी विचारले व ती काढण्याची पद्धत समजावून घेतली. त्यांची पद्धत चुकीची आहे हे माझ्या लक्षात आले व तसे मी त्यांना सांगितले. त्यावर त्या संचालकांनी सरकारने दबाव आणल्याने त्यांना हवी तशी तिमाही आकडेवारी तयार करून दिल्याची कबुली दिली.