बिहारसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

By admin | Published: September 15, 2015 05:10 AM2015-09-15T05:10:59+5:302015-09-15T05:10:59+5:30

तीन दिवसांच्या प्रचंड परिश्रमानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची समजूत घालण्यात भाजपाला अखेर सोमवारी यश आले. जागावाटपाबाबत झालेल्या अंतिम समझोत्यानुसार

Nominated for NDA's election for Bihar | बिहारसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

बिहारसाठी रालोआचे जागावाटप जाहीर

Next

- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
तीन दिवसांच्या प्रचंड परिश्रमानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची समजूत घालण्यात भाजपाला अखेर सोमवारी यश आले. जागावाटपाबाबत झालेल्या अंतिम समझोत्यानुसार बिहारमध्ये भाजपा १६0, पासवान यांचा लोजपा ४0, उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोकसमता पक्ष २३ आणि जीतनराम मांझींचा हिंदुस्तान अवाम पक्ष (हम) २0 जागांवर निवडणूक लढवेल. याखेरीज ‘हम’चे काही उमेदवार भाजपाच्या चिन्हावरही निवडणूक लढतील, अशी घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात घाईगर्दीत बोलावलेल्या पत्रपरिषदेत केली.
भाजपाने सुरुवातीला पासवान यांना ४0 व ‘हम’ला अवघ्या १३ जागा देऊ केल्या. तेव्हा मांझी भलतेच भकडले होते. पासवान दलितांचे दिखाऊ नेते आहेत. आजवर त्यांनी फक्त कुटुंबाचाच विचार केला. बिहारचा दलित व महादलित समाज त्यांचे नेतृत्व मानत नाही, अशी कठोर टीका मांझींनी जाहीरपणे केली. ‘हम’चे १३ आमदार आहेत. महादलित मतांवर केवळ ‘हम’चे उमेदवारच प्रभाव टाकू शकतात. पासवान यांच्या लोजपाइतक्या जागा आपल्याला मिळायलाच हव्यात अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, अशी धमकीही मांझींनी दिली होती. बिहारचे प्रभारी केंद्रीय मंत्री अनंतकुमार, धर्मेंद्र प्रधान, महासचिव भूपेंद्र यादव यांनी हरप्रकारे मांझींची समजूत घालून पाहिली मात्र ते ऐकायला तयार नव्हते. अखेर रविवारी रात्री २0 जागांवर तडजोड झाली. ‘हम’च्या काही उमेदवारांना भाजपतार्फे लढवण्यास ते तयार झाल्यावर मांझी आणि पासवान या दोघांचेही हसरे चेहरे पत्रपरिषदेनंतर पाहायला मिळाले.
पत्रपरिषदेत अमित शहा नेहमीपेक्षा अधिक प्रसन्नचित्त होते. याचे आणखी एक कारण मजलिस इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम)चे नेते असदुद्दीन ओवेसींनी शनिवारी अचानक बिहारच्या सीमांचल भागातल्या किशनगंज, पूर्णिया, अररिया आणि कटिहार अशा चार जिल्ह्यात निवडणूक लढवण्याची घोषणा केली. या भागात मुस्लिम मतदार जवळपास ४५ लाखांच्या आसपास आहेत.
तथापि सीमांचल भागात मुस्लिम मते विखुरण्याचा आजवरचा इतिहास नाही. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसादांचा राजद आणि नितीशकुमारांचा जद(यु) एकमेकांच्या विरोधात लढत होते. त्यावेळी बिहारमधे अन्य भागात मुस्लिमांची मते जरूर विखुरली
मात्र सीमांचल भागात लालूंच्या राजदला ७0 टक्के मुस्लिमांचे एकतर्फी मतदान झाले.
अमित शहा यांची डोकेदुखी वाढवणाऱ्या आणखी दोन बातम्या म्हणजे मांझीना जागा वाढवून दिल्यानंतर चिराग पासवान यांनी जागा वाढवून घेण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. दुसरी बातमी रालोआचा घटक पक्ष शिवसेना बिहारमधे ५0 जागांवर निवडणूक लढणार आहे. पक्षाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनी ही घोषणा केली.
बिहारमधे किमान ७0 जागा अशा आहेत की दोन्ही आघाड्यांचे तुल्यबळ उमेदवार परस्परांसमोर उतरल्यास निवडणुकीतला जय पराजय १ ते २ हजार मतांच्या फरकानेही होऊ शकेल. अशावेळी छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी मिळवलेली मते निर्णायक ठरू शकतात. या संदर्भातल्या कोणत्याही प्रश्नावर अमित शहा यांनी भाष्य करण्याचे टाळले.

महायुतीत आधीच फूट -शहा
जनता परिवारातील नेते मुलायमसिंग यादव बाहेर पडल्यामुळे महायुतीत आधीच फूट पडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १७ वर्षांपासूनची युती तोडत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. रालोआ निश्चितच सत्तेवर येईल. १२ लाख कोटींच्या घोटाळ्यात गुंतलेल्या काँग्रेससोबत युती करीत नितीशकुमार यांनी भ्रष्टाचारमुक्त बिहारचे आश्वासन दिले आहे. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांची कारकीर्द जंगलराज म्हणून ओळखली जाते. त्यांच्याच साथीने नितीशकुमार गुन्हेगारीमुक्त बिहारचे वचन देत आहेत, असे शहा म्हणाले.

Web Title: Nominated for NDA's election for Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.