नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

By admin | Published: December 27, 2016 03:56 PM2016-12-27T15:56:05+5:302016-12-27T19:16:45+5:30

नियोजन आणि पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही.

Nomination decision is unsuccessful - Opposition Lyrics | नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

नोटाबंदीचा निर्णय फसला - विरोधकांचे टीकास्त्र

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 27 - ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचाऱ्यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी विविध पळवाटा काढल्याने नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला असून, मोदींनी मागितलेली 50 दिवसांची मुदत संपत आली तरी देशातील परिस्थिती सुधरलेली नाही, असे टीकास्त्र विरोधी पक्षांनी आज मोदी सरकारवर सोडले. आज दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस आणि तृणमूलसह अन्य विरोधी पक्षांनी नोटाबंदीवरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारच्या या निर्णयामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांचे काहीच नुकसान झाले नाही. देशातील गोरगरीब आणि शेतकऱ्यांना मात्र या हेकोखोर निर्णयामुळे त्रास होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी आज केला. तसेच हा निर्णय फसल्याने त्याची जबाबदारी स्वीकारून मोदींनी आता पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधकांनी केली. 
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह राजद आणि डीएमकेचे नेते उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी तसेच अन्य विरोधी पक्षातील नेत्यांनी नोटाबंदीचा निर्णय आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडले. यावेळी राहुल गांधींनी मोदीविरोधात पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला, ते म्हणाले,  "नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांनी अनेक पळवाटा काढून काळ्याचे पांढरे करून घेतले. मात्र नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली, गरीब शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे" यावेळी सहारा आणि बिर्लांकडून मिळालेल्या पैशांवरून मोदींविरोधात पुन्हा निशाणा साधत राहुल यांनी पंतप्रधानांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. 
यावेळी नोटाबंदीवरुन सरकारविरोधात सुरुवातीपासूनच आघाडी उघडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर कठोर शब्दात टीका केली. मोदी आणि नोटाबंदी विरोधात विरोधी पक्ष एकत्र येऊन लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, 'नोटाबंदीमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत, मोदींनी अच्छे दिन आणण्याचे वचन दिले होते. ते हेच अच्छे दिन का?' नोटाबंदीमुळे देश 20 वर्षे मागे गेला असून,  गोरगरीब जनता उपाशीपोटी राहिली तरी नोटाबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, असा घणाघातही त्यांनी केला. मोदी सरकार कॅशलेसवरून बेसलेस झाले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेताना सरकारने संसदेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला."नोटाबंदीबाबत सरकारने संसदेत काहीही माहिती दिली नाही, संसदेला विश्वासात घेतले नाही. संसदेला विश्वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे, " असे त्या म्हणाल्या. यावेळी राजद तसेच इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही नोटाबंदीविरोधात टीका केली. मात्र डावे आणि संयुक्त जनता दलाची अनुपस्थिती  या पत्रकार परिषदेत प्रकर्षाने जाणवली. 
 
 
 

Web Title: Nomination decision is unsuccessful - Opposition Lyrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.