३४ मंत्र्यांना दिली उमेदवारी; पहिल्या यादीत भाजपचा सावध पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 07:10 AM2024-03-03T07:10:00+5:302024-03-03T07:10:39+5:30
यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पुढच्या काळात भाजपकडून जाहीर होणाऱ्या उर्वरित २४० नावांच्या यादीत आश्चर्य दिसू शकते.
हरीश गुप्ता -
नवी दिल्ली : मंत्रिमंडळात एकूण ७८ सदस्य असलेल्या मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री मीनाक्षी लेखी वगळता इतर कोणत्याही मंत्र्याला लोकसभेचे तिकीट नाकारलेले नाही. शनिवारी जाहीर झालेल्या १९५ उमेदवारांच्या यादीत डॉ. हर्षवर्धन, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यादीत ३४ विद्यमान मंत्र्यांची नावे आहेत. राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, पुढच्या काळात भाजपकडून जाहीर होणाऱ्या उर्वरित २४० नावांच्या यादीत आश्चर्य दिसू शकते. उत्तर प्रदेशातून जाहीर झालेल्या ५१ जणांच्या यादीत मनेका गांधी व मुलगा वरुण गांधी यांचे नाव नाही. ब्रिजभूषण शरण सिंह यांचेही नावही नाही. पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचे पुत्र साकेत मिश्रा यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. दिल्लीतील ५ नावांपैकी चार नवे चेहरे आहेत. गुजरातमध्ये १५ पैकी १० नावे तीच आहेत, पाच नवीन आहेत.
भाजपने १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु युती असलेल्या अनेक महत्त्वाच्या राज्यांतील नावे मागे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरयाणा, हिमाचल, कर्नाटक, ओडिशा, बिहार, तामिळनाडू आणि इतरांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने येत्या दहा दिवसांत निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतरच पक्ष नेतृत्व याबाबत पुढील पाऊल टाकेल.
राज्यसभेतील कोणते सदस्य रिंगणात
- मनसुखा मांडविया, पुरुषोत्तम रुपाला, भूपेंद्र यादव, राजीव चंद्रशेखर अशा राज्यसभेचे सदस्य असलेल्या अनेक मंत्र्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
- मात्र निर्मला सीतारामन, एस. जयशंकर आणि इतर अनेक मंत्री या यादीत दिसत नाहीत. आसनसोलमधील गायक पवन सिंग वगळता या यादीत फारसे चित्रपट कलाकार नाहीत.