मल्ल्यांवर अजामीनपात्र अटक वॉरंट
By admin | Published: August 7, 2016 01:49 AM2016-08-07T01:49:38+5:302016-08-07T01:49:38+5:30
उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अडचणी वाढतच असून दिल्लीतील एका न्यायालयाने धनादेश न वटल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढले आहे.
नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या अडचणी वाढतच असून दिल्लीतील एका न्यायालयाने धनादेश न वटल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटकवॉरंट काढले आहे. मल्ल्या यांना हजर करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
महानगर दंडाधिकारी सुमीत आनंद यांनी मल्ल्या यांना ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. परराष्ट्र मंत्रालयाद्वारे अजामिनपात्र अटक वारंट बजावले जावे, असे या आदेशात म्हटले आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये असल्याचे सांगितले जाते.
वारंवार समन्स बजावूनही मल्ल्या न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हजर करण्यासाठी सरकारी यंत्रणेने हस्तक्षेप करणे
गरजेचे झाले असल्याचे न्यायालयाने म्हटले.
डायल कंपनीने धनादेश न वटल्या प्रकरणी मल्ल्यांना कोर्टात खेचले आहे. ही कंपनी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन सांभाळते. मल्ल्यांची कंपनी किंगफिशर एअरलाईन्सने डायलला २२ फेब्रुवारी २०१२ रोजी
एक कोटी रूपयांचा धनादेश
दिला होता. मात्र, तो वटला
नाही. डायलने जून २०१२ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सच्या ७.५ कोटी रूपयांच्या धनादेशाशी संबंधित
चार प्रकरणे दाखल केली
आहेत. किंगफिशरने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेतलेल्या सेवेच्या बदल्यात हे धनादेश दिले
होते.
मल्ल्या यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेली किंगफिशर एअरलाईन्सचे ही कंपनी सध्या बंद पडली असून, मल्ल्यांकडे विविध बँकांची नऊ हजार कोटी रूपयांची थकबाकी असून बँकांनी थकबाकीच्या वसूलीसाठी न्यायालयात त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. गेल्या महिन्यात मुंबईत हवाला व्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते न्यायालयात हजर झाले नाहीत.
मल्ल्या यावर्षी मार्चमध्ये देशातून पळाले होते. ते ब्रिटनमध्ये असल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरुद्ध धनादेश न वटल्याची अनेक प्रकरणे दाखल आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)