SEBIनं सुब्रतो रॉय यांच्या विरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट केलं रद्द
By admin | Published: April 21, 2017 05:24 PM2017-04-21T17:24:44+5:302017-04-21T17:46:13+5:30
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सेबी कोर्टानं दिलासा दिला आहे. सुब्रतो रॉय हे नियमित सुनावणीला उपस्थित राहत असल्यानं सेबी कोर्टानं सुब्रतो रॉय यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केलं आहे. रॉय यांच्यावरील आरोप निश्चित प्रकरणावरही 18 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं कोर्टानं सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं 300 कोटी रुपये भरण्यात अपयशी ठरल्याने सहाराच्या पुणे येथील अॅम्बी व्हॅलीतील मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. सहारा समूह गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यात अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला होता. त्यावेळी 17 एप्रिल 2017पर्यंत सहारा समूहानं रक्कम न भरल्यास पुण्यातील अॅम्बी व्हॅलीच्या 40,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा, असा सल्लावजा आदेशच सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाला दिला होता.
मालमत्तेच्या लिलावातून गुंतवणूकदारांच्या ठेवी त्यांना पुन्हा मिळवून देण्यासाठी रक्कम जमवण्यास मदत होईल, यासाठी सहारा समूहाला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. सहाराच्या अॅम्बी व्हॅलीचे मूल्य 40 हजार कोटी रुपये आहे. 17 एप्रिलपर्यंत ही रक्कम भरण्यात येईल, असं सहारा समूहानं न्यायालयाला आश्वासन दिलं होतं. यापूर्वी 28 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयानं सांगितले होते की, जर या प्रकरणात काही रक्कम जमा करण्यात येत असेल तर न्यायालय वेळ वाढवून देण्याबाबत विचार करेल. दरम्यान, सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी सहाराची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या आईच्या निधनानंतर 6 मे 2016 रोजी न्यायालयाने रॉय यांना चार आठवड्यांसाठी पॅरोल मंजूर केला होता. त्यानंतर पॅरोलची मुदत वाढवूनही देण्यात आली होती. तसेच 4 मार्च 2014 रोजी रॉय यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आले होते.