रेल्वे वाहतुकीसाठी काही राज्यांकडून असहकार्य, रेल्वे मंत्रालयाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:50 AM2020-05-15T05:50:48+5:302020-05-15T05:54:38+5:30
असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारे यांच्यात रेल्वे वाहतुकीवरून वाद थांबायला तयार नाही. अनेक राज्ये अशी आहेत की, ती त्यांच्याकडे रेल्वेगाड्या येऊ देत नाहीत, असे केंद्राने आधीच म्हटलेले होते. यामुळे त्या त्या राज्यांत अडकून पडलेले स्थलांतरित कामगार व इतर लोकांना त्यांच्या राज्यांत परत पाठवण्याच्या कामात अडथळे आले आहेत. असहकार्य करत असलेल्या राज्यांनी त्यांच्याकडे रेल्वेगाड्यांना प्रवेश द्यावा आणि रेल्वेगाड्यांच्या येण्याजाण्याची संख्या वाढवावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली असल्याचे रेल्वेमंत्रालयाने म्हटले.
असे प्रश्न पश्चिम बंगाल व महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे त्याचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले की, पश्चिम बंगालने आठ मेपर्यंत आठ रेल्वेगाड्यांना येऊ दिले जाईल, असे म्हटले होते. परंतु, आजही या रेल्वे धावलेल्या नाहीत. पश्चिम बंगालसाठी फक्त दोन रेल्वेगाड्या धावल्या आहेत. पश्चिम बंगालच्या असहकार्यामुळे त्या राज्यात राहणाऱ्यांचीच अडचण झाली आहे असे नाही तर त्या राज्यात अडकून पडलेल्यांना तेथून बाहेर काढता येत नाही.
रेल्वे मंत्रालयातील अधिकारी म्हणाला की, ‘‘महाराष्ट्रातही अशाच अडचणी येत आहेत. महाराष्ट्र बाहेरून रेल्वे येऊ देण्यात सहकार्य करत नाही. इतर राज्यांत अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांच्या राज्यात परत येण्यात अडचणी येत आहेत तसेच महाराष्ट्रातून बाहेर राज्यांत जाऊ इच्छिणाऱ्यांना सरकारमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्राने रेल्वेंची संख्या वाढवावी व रेल्वेंना येऊ देण्यात सहकार्य करावे.’’