अशासकीय सल्लागारांना व महामंडळ अध्यक्षांना हटविले
By admin | Published: March 22, 2017 12:42 AM2017-03-22T00:42:26+5:302017-03-22T00:42:26+5:30
उत्तर प्रदेशातील अशासकीय सल्लागार, विविध महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
लखनौ : उत्तर प्रदेशातील अशासकीय सल्लागार, विविध महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्यानुसार, मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी या पदाधिकाऱ्यांना तत्काळ पदमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना, या नेमणुका करण्यात आल्या होत्या आणि नवे सरकार आल्यावर त्यांना जावे लागेल, हे अपेक्षितच होते.
सर्व प्रमुख सचिव, सचिव व अन्य अधिकारी यांनी या आदेशांचे पालन करावे, अशा सूचना मुख्य सचिव राहुल भटनागर यांनी दिल्या आहेत. पूर्वीच्या सपा सरकारने विविध महामंडळ, समित्या आणि विभागातील ८० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. यात पक्षाचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे व्यक्ती आहेत. काही पदाधिकाऱ्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता.
समाजवादी पक्षाच्या पराभवानंतर ज्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत, त्यात मुख्यमंत्र्यांचे सल्लागार माजी मुख्य सचिव अलोक रंजन, उर्दू अकादमीचे अध्यक्ष नवाज देवबंदी, हिंदी संस्थानचे अध्यक्ष उदय प्रताप यादव यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे. सरकारने राज्य अल्पसंख्यांक आयोग, मागास वर्ग आयोग आणि राज्य महिला आयोगासह अनेक विभागांच्या अध्यक्षांबाबत निर्णय घेतलेला नाही. (वृत्तसंस्था)