प्रश्नपत्रिकेच्या लिफाफ्यावर सीलसोबत नॉन टेंपरिंग चिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 05:17 AM2018-03-31T05:17:58+5:302018-03-31T05:17:58+5:30
प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे बोर्ड प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी नव्या सुरक्षा उपायांवर विचार करण्यात येत आहे
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर सीबीएसईच्या परीक्षा प्रणालीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे बोर्ड प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी नव्या सुरक्षा उपायांवर विचार करण्यात येत आहे. यानुसार, ज्या लिफाफ्यात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठविली जाते त्या लिफाफ्यावर नॉन टेंपरिंग चिप लावण्याबाबत बोर्ड अधिकाऱ्यात विचार होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चिपचा फायदा असा होणार आहे की, जेथे हा लिफाफा जाईल तेव्हा त्याच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल आणि जेव्हा हा लिफाफा उघडण्यात येईल तेव्हा चिपच्या टेंपर होण्याची म्हणजे लिफाफा उघडला गेल्याची सूचना थेट परीक्षा शाखेच्या मुख्य सर्व्हर रुममध्ये पोहचेल.
एका अधिकाºयाने सांगितले की, या तंत्राचा अवलंब करण्याचे संकेत मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी दिले आहेत. त्यांनी अलीकडेच सांगितले होते की, आता तंत्रज्ञानाचा उपयोग करुन प्रश्नपत्रिका लीक होण्याचे प्रकार रोखले जाऊ शकतात.
अर्थात, या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यापूर्वी याचे परीक्षण केले जाईल. याशिवाय सी- डॅक अथवा अन्य तांत्रिक संस्थेकडून याची तांत्रिक पडताळणी केली जाईल.'
असा आहे नियम...
सुरक्षेच्या कारणास्तव प्रश्नपत्रिका बँक लॉकरमध्ये ठेवल्या जातात. ज्या शाळेला परीक्षा केंद्र बनविले जाते त्यांना हे सांगितले जाते की, कोणत्या बँकेत जाऊन प्रश्नपत्रिका घ्यायच्या आहेत. परीक्षेच्या दिवशी एखाद्या शिक्षकाला सकाळी ८.३० वाजता बँकेत पाठविले जाते. तो प्रश्नपत्रिका लिफाफ्यातून कोणत्याही परिस्थितीत स. ९.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचवितो.