नोटाबंदी तर आर्थिक दहशतवादच! यशवंत सिन्हा पुन्हा कडाडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 05:00 AM2017-10-16T05:00:11+5:302017-10-16T05:00:27+5:30
नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत
अकोला : नोटाबंदीचा निर्णय हा निव्वळ आर्थिक दहशतवाद होता. सरकारमधील नेते आकड्यांचा खेळ करत आहेत. मात्र अशा आकडेबाजीच्या खेळाने देशाचे भले होत नसते, अशा शब्दांत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारवर घणाघात केला. ते अकोला येथे बोलत होते.
शेतकरी जागर मंचच्यावतीने सिन्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नोटाबंदी, जीएसटी आणि अर्थव्यवस्थेवरून सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला आपल्या टिकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, माझ्या लेखानंतर देशभरातून आलेल्या प्रतिक्रिया या देशात काहीतरी चुकत आहे, हे स्पष्ट करणाºया आहेत. हे चांगले संकेत आहेत. सरकार चुकत आहे, हे कुणीतरी सांगितले पाहिजे. त्यासाठी राजशक्तीपेक्षाही मोठी शक्ती असलेल्या लोकशक्तीचा लढा उभारण्याची गरज आहे.
देशाची अर्थव्यवस्था सध्या विचित्र स्थितीत आहे. शेतकरी संकटात, व्यापारी त्रस्त, युवकांना नव्या नोकºया नाहीत, त्यामुळे समाजातील कोणताच घटक खुश नाही. मुळात जीएसटीमध्येच अनेक त्रुटी आहेत. त्यामुळेच हा ‘गुड अॅण्ड सिम्पल’ टॅक्स न राहता ‘बॅड अॅण्ड कॉम्प्लिकेटेड’ टॅक्स झाला आहे. जीएसटीमधील विसंगती दूर करा, अन्यथा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
नोटाबंदी ही पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सर्वच व्यवहार आॅनलाइन करण्याचा निर्णय झाला. लाइनही नाही अन् आॅनही नाही, असा हा हास्यास्पद प्रकार ठरला. बदल वेगाने होत नसतात, त्याची गती किमान एका लयीत असावी लागते. नोटाबंदीनंतर दोन लाख शेअर कंपन्यांची व १८ लाख लोकांची चौकशी सुरू झाली आहे, हे नोटाबंदीचे वास्तव आहे, यावर काय बोलावे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
या सरकारचे शेतीचे धोरणही अजबच आहे. महाराष्टÑात नाफेडने शेतकºयांकडून तूर, मूग, उडीद खरेदीचा निर्णय घेतला; मात्र प्रतिएकर दोन क्विटंल खरेदीची टाकलेली अट ही हास्यास्पद आहे. जर उत्पादनच एकरी पाच ते आठ क्विंटल असेल, तर खरेदीला बंधन का? ही अट तत्काळ कमी केली पाहिजे, अन्यथा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
‘मित्रों’ टाळणार म्हटले; पण आलेच!
यशवंत सिन्हा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना बंधू-भगिनींनो, अशी केली आणि जाणीवपूर्वक ‘मित्रों’ म्हटले नाही, असे स्पष्टीकरण दिल्यावर सभागृहात हशा उमटत टाळ्यांचा गजर झाला; मात्र सिन्हा यांनी भाषणाच्या ओघात दोन वेळा ‘मित्रों’ म्हटल्यावर त्यांनी अब क्या करे, सुनने की आदत पडी, असे सांगत दोस्तों असे म्हणणार असल्याचे स्पष्ट करून सभागृहाचे लक्ष वेधले.
...तर लेख कशाला लिहिला असता ?
मला अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडत नाही? मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता? असा सवाल सिन्हा यांनी केला.