Train Accident: नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसच्या अपघातामागे घातपात? रेल्वे बोर्डाने दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 09:27 AM2023-10-12T09:27:24+5:302023-10-12T09:29:31+5:30
North East Express Train Accident: बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून उतरलेल्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची उच्चस्तरीय तपासाच्या आदेशाला स्वीकृती दिली आहे.
बिहारमधील बक्सरच्या रघुनाथपूर स्टेशनजवळ रुळावरून उतरलेल्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची उच्चस्तरीय तपासाच्या आदेशाला स्वीकृती दिली आहे. तसेच अधिकाऱ्यांचं पथक तपास कार्याला सुरुवात केली आहे. अपघाताच्या सर्व पैलूंवर तपास केला जात आहे. एसी थ्री टियरचे दोन डबे उलटल्याने आणि चार डबे रुळावरून घसरल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर एकापाठोबाठ एक असे २१ डबे रुळावरून घसरले.
यादरम्यान, रेल्वे बोर्डाने दुर्घटनेची कारणं जाणून घेण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासामध्ये रेल्वेचं रुळ अनेक ठिकाणी तुटलेले आढळले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळांचं नुकसान करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र रेल्वेचे अधिकारी सध्या यावर काही बोलणं टाळत आहेत. अशा परिस्थितीत तपास अहवाल समोर आल्यानंतरच याबाबतचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.
बुधवारी रात्री सुमारे साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीतून कामाख्या (आसाम) येथे जात असलेली १२५०६ नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेस बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर येथे दुर्घटनाग्रस्त झाली होती. या दुर्घटनेनंतर ट्रेनचे अनेक डबे रुळावरून उलटले. त्यानंतर दोन डबे एकमेकांवर आदळून दुर्घटनाग्रस्त झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील सर्व जिल्हास्तरीय अधिकारी आणि डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले.
बक्सरचे जिल्हाधिकारी अंशुल अग्रवाल यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थली पोहोचून बचाव मोहीम सुरू केली आहे. या भीषण अपघातानंतर येथून होणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० ते ९० लोक जखमी झाले आहेत. या जखमींवर उपचार सुरू आहेत.