श्रीनगरसह उत्तर भारताला हुडहुडी

By admin | Published: December 22, 2016 12:58 AM2016-12-22T00:58:39+5:302016-12-22T00:58:39+5:30

वर्ष संपायला आले असताना आणि नाताळचा सण तोंडावर असताना, हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने श्रीनगरला अक्षरश: कवेत घेतले आहे

North India with Srinagar, Hudhudi | श्रीनगरसह उत्तर भारताला हुडहुडी

श्रीनगरसह उत्तर भारताला हुडहुडी

Next

श्रीनगर : वर्ष संपायला आले असताना आणि नाताळचा सण तोंडावर असताना, हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने श्रीनगरला अक्षरश: कवेत घेतले आहे. येथील तापमान उणे ६.५ वर पोहचले असून सहा वर्षातील हा नीचांक आहे. काश्मीरात सद्या ‘चिल्लई कला’चा (आगामी ४० दिवस पडणारी थंडी) अनुभव येत आहे. चिनार आणि देवदार वृक्षांनी सजलेल्या काश्मीरात थंडी प्रचंड वाढली असून निसर्गाचे नवे रुप या माध्यमातून पहायला मिळत आहे.
भारताच्या सर्व उत्तरेकडील राज्यांमध्येही चांगली थंडी पडू लागली असून, त्यामुळे लोक दिवसाही स्वेटर्स, कोट व शाली पांघरून घराबाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीत बुधवारीही सकाळी गारठा आणि धुके यांचे साम्राज्य होते. धुक्यामुळे अनेक विमाने व रेल्वे सेवा विलंबाने सुरू होती. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही.
चिनार वृक्षांवरुन हळूवार कोसळणारा बर्फ एव्हाना थंडीचा सांगावा घेऊन आला आहे. मंगळवारची रात्र गत सहा वर्षातील सर्वाधिक थंडीची होती. काश्मीर खोरे आणि लडाखमध्ये थंडीने दस्तक दिली आहे. पहलगाम आणि गुलमर्ग वगळता पूर्ण श्रीगनरमध्ये तापमान खूपच खाली गेले आहे. श्रीनगरमध्ये तापमान उणे ६.५ डिग्री सेल्सिअसवर आहे. मंगळवारी रात्री हे तापमान उणे ५.५ एवढे होते. यापूर्वी अशी कडाक्याची थंडी २७ डिसेंबर २०१० मध्ये होती. त्यावेळी तापमान उणे ६.६ डिग्री सेल्सिअस होते. त्यापूर्वी १३ डिसेंबर १९३४ मध्ये श्रीनगरमध्ये तापमान उणे १२.८ पेक्षा खाली गेले होते. या थंडीने डल लेकसह अनेक सरोवरातील पाणी गोठवले आहे. वसाहतीत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधील पाणीही गोठले आहे.
लडाख भागातील लेहमध्येही यंदाच्या हिवाळ्यातील सर्वाधिक थंडीची नोंद करण्यात आली आहे. येथे तापमान उणे १४.९ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले होते. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लेहमध्ये राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान नोंदविले गेले. कारगिलमध्ये तापमान उणे ११.४ डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी होते. काश्मीर खोऱ्याचे प्रवेशव्दार असलेल्या काजीगुंडमध्ये यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमान होते.
कुपवाडात तापमान उणे ५.५ डिग्री सेल्सिअस तर पहेलगाममध्ये उणे ६.९ आणि गुलमर्गमध्ये उणे २.२ डिग्री सेल्सिअस होते. ४० दिवसांचा थंडीचा काळ ३१ जानेवारी पर्यंत असेल. त्यानंतर २० दिवसाचा ‘चिल्लई खुर्द’असतो. याला ‘लहान थंडी’ म्हणतात.

Web Title: North India with Srinagar, Hudhudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.