उत्तर भारताला वादळाचा तडाखा, 109 जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:16 AM2018-05-04T05:16:04+5:302018-05-04T05:16:04+5:30
उत्तर भारतात जोरदार पाऊस, धुळीचे वादळ व जोरदार वारा यामुळे बुधवारी रात्री १०९ जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले
नवी दिल्ली : उत्तर भारतात जोरदार पाऊस, धुळीचे वादळ व जोरदार वारा यामुळे बुधवारी रात्री १०९ जणांचा बळी गेला असून, शेकडो लोक जखमी झाले. वादळी वारे व पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश आणि राजस्थानला बसला आहे. उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली आहेत व वीजपुरवठाही खंडित झाला आहे. वादळाचा तडाखा बसलेल्या राज्यांमध्ये तातडीने मदत व पुनर्वसनाचे काम सुरू करण्याचे आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. धुळीच्या वादळाचा सर्वांत जास्त तडाखा उत्तर प्रदेशला बसला. चार जिल्ह्यांत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. या चार जिल्ह्यांत तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशात आग्रा जिल्ह्यात सर्वाधिक ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
ताशी १०० किमीहून जास्त इतक्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाºयाच्या साथीने या धुळीच्या वादळाने बुधवारी सकाळी ७ वाजता राजस्थानला तडाखा दिला. वादळात धौलपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. तिथे १७ जण मरण पावले आहेत. त्यापैकी बहुतांश लोकांचा मृत्यू वादळामुळे घरे कोसळल्याने त्याखाली दबून झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीत मरण पावलेल्यांबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
उत्तराखंड, मध्य प्रदेशलाही घेरले
उत्तराखंड राज्यामध्ये बुधवारी पहाटे धुळीच्या वादळाबरोबरच जोरदार पाऊसही पडला. या दुहेरी माºयामुळे तेथील कुमाऊ भागात दोन ठार व काही जण जखमी झाले आहेत.
या आपत्तीमुळे चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या यात्रेत अडथळे निर्माण झाले आहेत. चामोलीतील नारायण बागर येथे ढगफुटी झाल्याचेही म्हटले जात असून स्थानिक प्रशासनाने मात्र त्याचा इन्कार केला आहे.
उत्तराखंडमधील चामोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, पिठोरगढ या जिल्ह्यांमध्ये येत्या ४८ तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील कल्याणपूर गावात चार वर्षांचा एक मुलगा व सतना येथील उचेरा येथे एका व्यक्तीचा वादळामुळे मृत्यू झाला आहे.
योगींना काँग्रेसचा चिमटा
धुळीच्या वादळाचा तडाखा बसून उत्तर प्रदेशात भलेही अनेक लोक मरण पावले असतील पण मी मात्र कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातील खेळींमध्येच गुंतलो आहे, असा चिमटा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काँग्रेसचे नेते रणदीप सुर्जेवाला यांनी टिष्ट्वट करून बुधवारी काढला. आदित्यनाथ सध्या कर्नाटकच्या प्रचारदौºयावर आहेत.
राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून, ६० टक्के जखमी असलेल्या लोकांना २ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. ४०-५० टक्के जखमी असणाºयांना ६० हजार रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत.
अंदाज पूर्वेकडचा, फटका उत्तरेला!
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्व भारत आणि उत्तर-पूर्व भारतात वादळाचा तडाखा बसेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र राजस्थानसह उत्तर भारतात कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचा इशारा दिला गेला नव्हता. या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वादळ येईल, पाऊस पडेल किंवा धुळीचे वादळ निर्माण होईल असा कोणताही इशारा दिला नव्हता. याचा अर्थ मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज घेण्यात हवामान खात्याला अपयश आले आहे. स्कायमेट या खासगी संस्थेने राजस्थानात १ मे रोजी धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र त्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते.