उत्तर भारतीयांनो गुजरात सोडा, 14 महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कारानंतर धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 10:24 AM2018-10-05T10:24:27+5:302018-10-05T10:26:47+5:30

14 महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील असंतोष तीव्र झाला आहे.

North Indians Leave Gujarat, Threats by Locals | उत्तर भारतीयांनो गुजरात सोडा, 14 महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कारानंतर धमकी

उत्तर भारतीयांनो गुजरात सोडा, 14 महिन्यांच्या चिमुकलीवरील बलात्कारानंतर धमकी

Next

अहमदाबाद -  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बिहारी मजुराने केलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील असंतोष तीव्र झाला आहे. या घटनेविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असून, गुरुवारी या आंदोलनाने हिंसक रूप धारण केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी बिहारमधील रहिवासी असल्याने आंदोलकांकडून उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात येत आहे. तसेच त्यांना गुजरात सोडून जाण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत.

28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. तसेच उत्तर भारतीयांवर हल्ल्याच्या घटनाही घडल्या. बुधवारी पोलिसांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. 

23 वर्षांचा उत्तर भारतीय ऑटोरिक्षा ड्रायव्हर असलेल्या केदारनाथ याच्यावर 25 जणांच्या जमावाने चांदलोडिया पुलावर हल्ला केला होता. बाहेरच्या लोकांनी गुजरात सोडावे, गुजराती जनतेला वाचवण्याची गरज आहे, अशा घोषणा जमाव देत होता, अशी माहिती केदारनाथ याने दिली आहे.
 तर साबरमती येथे स्कीन एक्स्पर्ट्सचे काम करणाऱ्या एका महिलेचा पाठलाग करून धमकावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. प्रतिमा कोरी असे धमकी देण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, चार जणांनी तिला अडवले. तसेच तिचा पाठलाग करून तिला शिविगाळ केली. यूपी, बिहारमधील लोकांनी गुजरात सोडून जावे, नाहीतर त्यांना ठार मारण्यात येईल, अशी धमकीही जमावाने दिली. दरम्यान या प्रकाराची तक्रार प्रतिमा यांनी पोलिसांकडे केली आहे. 

दरम्यान, अहमदाबादमधील मेघनीनगर येथेसुद्धा आंदोलनादरम्यान ठाकोर समुदायाने परप्रांतियांवर कारवाई करण्याची मागणी केली. मेहसाणा जिह्ल्यातील नंदसन आणि काडी येथेही उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत.  

Web Title: North Indians Leave Gujarat, Threats by Locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.