मान्सूनच्या हंगामामध्ये वायव्य भारतात सर्वाधीक पाऊस पडणार- हवामान विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 03:35 PM2018-05-30T15:35:51+5:302018-05-30T15:35:51+5:30
पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागासाठी चांगली बातमी
नवी दिल्ली- काल केरळमध्ये मान्सून हजर झाल्यानंतर भारतीय हवामान खात्याने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली व उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात सर्वाधीक पाऊस पडेल. तसेच जुलै हा सर्वात जास्त पावसाचा महिना असेल अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहेय
याबरोबरच मध्य भारतामध्ये पावसाचा जोर सामान्य (सरासरीइतका) असेल मात्र दक्षिण भारतामध्ये कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी येथे सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे भाकित हवामान खात्याने केले आहे. तसेच ईशान्य भारतामध्ये सामान्य पातळीपेक्षा कमी पाऊस पडेल असे सांगण्यात आल आहे.
टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास वायव्य भारतामध्ये या मान्सून हंगामात एलपीएच्या (लाँग पिरियड अॅवरेज)100 टक्के पाऊस पडेल. तर मध्य भारतामध्ये 99 टक्के, दक्षिण भारतामध्ये 95 टक्के आणि ईशान्य भारतात 93 टक्के इतका पाऊस पडेल.
एलपीएच्या 96 ते 104 इतका पाऊस पडल्यास तो सामान्य गृहित धरला जातो. 1951 ते 2000 या काळाचा अभ्यास करुन काढलेला एलपीए 89 सेंमी इतका आहे. एप्रिल महिन्यामध्ये भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पहिल्या अंदाजामध्ये मान्सून सामान्य म्हणजे 96 टक्के ते 104 टक्के इतका राहील असे सांगितले होते. नव्या अंदाजात त्यापेक्षा थोडा जास्त पाऊस पडेल असे संकेत दिले आहेत.