उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ : युती-आघाडीत मनोमिलनाची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 05:01 AM2019-02-09T05:01:57+5:302019-02-09T10:27:42+5:30
आलिशान बंगले ते झोपडपट्टी असलेला आणि कोळीवाड्यांपासून दाटीवाटीने उभ्या सोसायट्यांनी भरलेला मतदारसंघ म्हणून ‘उत्तर पश्चिम मुंबई’कडे पाहिले जाते.
- गौरीशंकर घाळे
आलिशान बंगले ते झोपडपट्टी असलेला आणि कोळीवाड्यांपासून दाटीवाटीने उभ्या सोसायट्यांनी भरलेला मतदारसंघ म्हणून ‘उत्तर पश्चिम मुंबई’कडे पाहिले जाते. अंधेरी पूर्व आणि पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी आणि जोगेश्वरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहेत. सहापैकी तीन विधानसभा शिवसेनेच्या, तर तीन भाजपाच्या ताब्यात आहेत.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे गजानन कीर्तिकर तब्बल एक लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले. काँग्रेसचे उमेदवार गुरूदास कामतांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही मोदी लाटेला थोपवू शकली नाही. आता पुन्हा कीर्तिकरांनी उमेदवारी मागितली आहे. वाढते वय आणि आजारपणामुळे त्यांना पर्याय दिला जाईल, अशी चर्चा होती. त्यांच्याऐवजी आमदार सुनिल प्रभू किंवा रवींद्र वायकरांचे नाव पुढे केले गेले. पण, मुंबई आणि राज्यातील राजकारण सोडून दूर दिल्लीत जायला ना वायकर तयार आहेत, ना प्रभू. त्यात वायकरांचा फटकळ स्वभावही आडवा आला. तेंव्हा मितभाषी, सर्वांना सांभाळून घेत पुढे जाणारा नेता म्हणून प्रभूंना उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेच्या वरिष्ठ वर्तुळात आहे. मात्र, कान-डोळे शाबूत असेपर्यंत काम करणार, असे सांगत कीर्तिकरांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरूवात केल्याने प्रभूंना जबरदस्तीने घोड्यावर बसवायचे की कीर्तिकरांना पुन्हा संधी द्यायची, हे कोडे ‘मातोश्री’ला सोडवायचे आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. ‘मोदी-मोदी’चा जप करत भाजपा कार्यकर्ते युतीच्या उमेदवारांसाठी राबले. पुढे विधानसभेला युती फिसकटली. विधानसभा, मुंबई महापालिका निवडणुकीतील यशाने मुंबई भाजपाचा नूरच बदलून गेला. दोन दशके छोटा भाऊ म्हणून वावरणारे थेट बरोबरीची भाषा करू लागले. तर, सत्तेत राहूनही शिवसेना भाजपावर निशाणा साधू लागली. स्थानिक पातळीवरही हा संघर्ष दिसून आला.
विकासकामांच्या श्रेयवादातून स्थानिक शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी भिडत राहिले. भाजपा आमदार भारती लव्हेकर आणि अमित साटम यांच्याशी या ना त्या कारणावरून कीर्तिकर आणि शिवसैनिकांचा संघर्ष होतच राहिला. या सर्वांचा परिणाम येत्या लोकसभेत पाहायला मिळणारच नाही, असे नाही. युती झाली तरी कीर्तिकरांसमोर भाजपा नेत्यांशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान असेल. भाजपासोबत असलेला मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मैदानात उतरला तरच कीर्तिकरांचा मार्ग सूकर होईल, अन्यथा नाही.
तिकडे काँग्रेसच्या गोटातही सध्या फ्री-स्टाईल कुस्ती सुरू आहे. गुरूदास कामतांचे अकाली निधन ही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक बाब होती. कामत हयात होते तेंव्हाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही होते. स्थानिक पातळीवर डाळ शिजत नसल्याने निरूपम दिल्लीत जोरदार फिल्डिंग लावून होते. त्याचा गुरूदास कामतांना मोठा मन:स्ताप झाला. कामतांच्या पश्चात कामत गट विखुरला असला, तरी निरूपम नको या भूमिकेवर हा गट ठाम आहे. शिवाय, माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनीही मतदारसंघावर दावा ठोकला आहे. ‘मराठी माझी मायमावशी आहे’ म्हणणारे कृपाशंकर आजही उत्तर भारतीय समाजातील आघाडीचे नेते आहेत. भरीस भर म्हणून निरूपम यांच्या विरोधातील कामत गटाने आपली शक्ती सिंग यांच्या मागे उभी केली आहे. शिवाय, बिहारी पार्श्वभूमीमुळे अन्य हिंदी भाषक निरूपम यांना आपलेसे मानत नाहीत. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी आणली तरी स्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्याचे मोठे आव्हान निरूपम यांच्यासमोर असेलच.
गेल्यावेळी मनसेने या मतदारसंघात ६६ हजार मते मिळवली. शिवसेनेविरोधात इंजिन धावले. यंदा ‘मोदी विरोध’ ही मनसेची भूमिका आहे. मनसेचे महेश मांजरेकर मध्यंतरी अन्य पक्षांच्या जवळ गेल्याच्या बातम्या होत्या. शिवाय, काँग्रेस आघाडीत सामील होत ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशीही चर्चा मनसेत आहे. त्याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने सध्यातरी युती आणि आघाडी अशीच थेट लढत होईल, असे गृहीत धरून स्थानिक मंडळी जुळवाजुळव करीत आहेत.
सध्याची परिस्थिती
युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कायम शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने विधानसभा आणि पालिका वगळता भाजपाला स्वत:च्या ताकदीचा अंदाज बांधता आलेला नाही.
विधानसभेत तीन आमदार आणि पालिकेतील संख्याबळ तीनवरून थेट २१ वर नेत या मतदारसंघातील वर्चस्व भाजपाने आता सिद्ध केले आहे.
शिवसेना- भाजपातील गेल्या चार वर्षांतील संघर्षाचा फटका विकासकामांना बसला. विशेषत: वर्सोव्यात खासदार विरुद्ध आमदार हा संघर्ष सतत दिसत होता.
तुमच्या अडीअडचणीला आम्ही असतो, मात्र मते भाजपाला जातात. आम्ही कामे करतो तर मतेही आम्हालाच द्या, अशी स्पष्ट भूमिका सध्या शिवसेना नेते मांडताना दिसतात.
4,64,820
गजानन कीर्तीकर
(शिवसेना)
2,81,792
गुरुदास कामत
(काँग्रेस)
66,088
महेश मांजरेकर
(मनसे)
51,860
मयांक गांधी
(आप)
11,009
नोटा