ईशान्येकडील राज्यांत बीफबंदी करणार नाही
By admin | Published: March 28, 2017 01:56 AM2017-03-28T01:56:38+5:302017-03-28T01:56:38+5:30
उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांच्या विरोधात जोरदार मोहीम योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राबविली असतानाच
गुवाहाटी : उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांच्या विरोधात जोरदार मोहीम योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राबविली असतानाच, ईशान्येकडील राज्यांमध्ये सत्तेवर आल्यास गोहत्येवर बंदी घातली जाणार नाही, असे भारतीय जनता पार्टीने म्हटले आहे. पुढील वर्षी ईशान्येकडील मेघालय, मिझोराम आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या तीनच नव्हे, तर ईशान्येकडील सर्वच राज्यांत अनेक जनावरांचे मांस सररास खाल्ले जाते.
मेघालय, नागालँड आणि मिझोराम या राज्यांत ख्रिश्चन बहुसंख्येने असून, गायीचे मांस तेथे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. भाजपाचे मेघालय शाखेचे सरचिटणीस डेव्हिड खारसाती यांनी रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही हितसंबंधी गटांनी तशा अफवा पसरवल्या आहेत. गोहत्येवर उत्तर प्रदेशात बंदी असली तरी तशी नागालँडमध्ये पुढील वर्षी आम्ही सत्तेवर आल्यास घातली जाणार नाही. नागालँडमधील वस्तुस्थिती खूपच भिन्न आहे.
यूपीमध्ये परवानाधारक कत्तलखान्यांनी घाबरू नये
बेकायदा कत्तलखान्यांवरच कारवाई केली जात आहे, असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी केले. परवानाधारक कत्तलखान्यांनी नियमांचे पालन करावे. आम्ही फक्त बेकायदा कत्तलखान्यांवरच कारवाई करीत आहोत, असे आरोग्य मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी येथे सांगितले.
परवानाधारक कत्तलखान्यांनी परवान्यातील नियमांचे पालन केले पाहिजे, त्यांना घाबरण्याचे कारण नाही, असे सिंह म्हणाले. अंडी, मासे आणि कोंबड्या विकणाऱ्या कोणत्याही दुकानावर कारवाई करण्याचे कोणतेही आदेश दिले गेलेले नाहीत, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी अति उत्साहात कृती आणि आपल्या अधिकाराचे उल्लंघन करू नये, असे आदेश सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले. कत्तलखान्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधन परवान्यात आहे. ते लवकरात लवकर लावण्यात यावेत.
तेवढ्या कारणास्तव पोलीस वा प्रशासनाने कत्तलखान्यांच्या मालकांवर सरसकट कारवाई करू नये. राष्ट्रीय हरित लवादाने २०१५मध्ये बेकायदा कत्तलखान्यांमुळे पर्यावरणाला धोका असल्याचे म्हटले होते. परंतु अखिलेश सरकारने काहीही कारवाई केली नाही, अशी टीकाही सिद्धार्थ नाथ सिंह यांनी केली.
बेकायदा कत्तलखान्यांवर होतेय कारवाई : सीतारामन
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार राज्यातील फक्त बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाई करीत आहे, असे वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात म्हशीच्या मांसाच्या निर्यातीत झालेली घट ही जागतिक कारणांमुळे होती, असेही त्या म्हणाल्या.