सव्वाशे कोटी जनता पाठीशी असल्यानं पाकिस्तानला घाबरत नाही- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 03:26 PM2019-03-06T15:26:03+5:302019-03-06T15:27:25+5:30
पंतप्रधानांची विरोधकांवर सडकून टीका
कलबुर्गी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचा दौरा करत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. सर्व विरोधी पक्ष फक्त आणि फक्त मोदीला हटवण्यासाठी एकत्र आले आहेत. पण मी मात्र दहशतवाद नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदी म्हणाले. मी दहशतवाद संपवतो आहे, देशातला भ्रष्टाचार संपुष्टात आणत आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते कलबुर्गीत एका जनसभेला संबोधित करत होते.
देशाच्या सव्वाशे कोटी जनतेची ताकद माझ्या पाठिशी आहे. त्यामुळे मी ना विरोधकांना घाबरत, ना पाकिस्तानला, असं मोदी म्हणाले. जोपर्यंत केंद्रात मोदी असेल, तोपर्यंत चोरांचं दुकान बंदच राहील, अशी टीका पंतप्रधानांनी विरोधकांवर केली. यावेळी त्यांनी कलबुर्गीत विविध योजनांचं भूमिपूजनदेखील केलं आणि आयुष्यमान योजनेसोबतच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. जोपर्यंत मी सत्तेत आहे, तोपर्यंत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करत राहीन, असं मोदींनी म्हटलं.
पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर शरसंधान साधलं. 'त्यांना भ्रष्टाचार हवा आहे. मात्र मोदी तो होऊ देणार नाही. केंद्रात भक्कम सरकार आहे, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे आता त्यांना कमकुवत सरकार हवं आहे,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारवरदेखील हल्लाबोल केला. 'तुमच्या राज्यात कमकुवत सरकार आहे. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती पाहा. इथले सत्ताधारी केवळ भ्रष्टाचार करत आहेत. प्रत्येकजण एक दुसऱ्याचे पाय ओढत आहेत,' अशी टीका त्यांनी केली.