..तर बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही - राजनाथ सिंह
By admin | Published: June 26, 2016 09:06 PM2016-06-26T21:06:26+5:302016-06-26T21:06:26+5:30
भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - भारत पहिली गोळी चालवणार नाही, पण पाकिस्तानने गोळीबार केला तर, आम्ही आमच्या बंदुकीतल्या गोळया मोजत बसणार नाही असा सणसणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला दिला. जम्मू-काश्मीर पांम्पोरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शनिवारी सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर बोलताना सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
दहशतवादी आणि शेजा-यांकडून भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे सिंह म्हणाले. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेने शनिवारी पांम्पोरमध्ये सीआरपीएफच्या बसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. कुठल्या त्रुटी राहिल्यामुळे हा हल्ला झाला त्याची माहिती घेण्यासाठी दोन सदस्यीय पथक काश्मिरला पाठवत असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
आपले जवान शौर्य गाजवताना प्रभावीपणे अतिरेक्यांना कंठस्नान घालत आहेत असे राजनाथ सिंह म्हणाले. शनिवारी झालेला हल्ला हा जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा पथकांवर झालेला या महिन्यातील चौथा हल्ला आहे. मागच्या तीन मोठया हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत.