संतांचा व्यवहारवाद न पटल्याने ते देव्हाऱ्यात
By Admin | Published: April 4, 2015 11:28 PM2015-04-04T23:28:56+5:302015-04-04T23:28:56+5:30
संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.
प्रतिनिधी- घुमान (संत नामदेवनगरी)
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम हे बंडखोर होते. ईश्वराचे लोकशाहीकरण करण्यासाठीच त्यांनी ‘संत साहित्य’ लिहिले. मात्र, संत साहित्याची उच्चतम मूल्ये धारण करण्याचे साहस न झाल्यामुळेच आणि त्यांचा व्यवहारवाद सोयीचा न वाटल्यामुळेच ते देव्हाऱ्यापुरते मर्यादित राहिले असल्याचा सूर शनिवारी परिसंवादात उमटला.
संमेलनात ‘संत साहित्य देव्हाऱ्यातच, व्यवहारात का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रा. ललित अधाने, बाळ कुळकर्णी आणि डॉ. संजयकुमार करंदीकर सहभागी झाले होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील होते.
४अधाने म्हणाले, संत साहित्य देव्हाऱ्यातच आहे, असे मुळीच नाही. केवळ त्याकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून आजवर पाहिले गेलेले नाही. संत साहित्याची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये उपनिषदात्मक साहित्य शिकविले गेले पाहिजे. विद्यापीठांमध्ये संत साहित्याचे तत्त्वज्ञान या विषयाचा समावेश झाला पाहिजे. बाळ कुळकर्णी यांनी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांतून सोदाहरण साहित्य आणि व्यवहारवाद याची व्याख्या विषद केली. ते म्हणाले,
संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे बंडखोर कवी होते.
त्यांनी ईश्वराचे लोकशाहीकरण केले. मात्र, संतांनी जो व्यवहारवाद सांगितला तो सोयीचा न वाटल्यामुळे त्यांना देव्हाऱ्यात बसविण्यात आले. संत साहित्याचा गाभा स्वार्थी बुद्धिवंतांनी लपवून ठेवला.
४करंदीकर म्हणाले, संत साहित्य सामाजिक चळवळ होऊ शकली नाही. त्यातील उच्चतम मूल्यांचा विचार आत्मसात न केल्यामुळेच ते व्यवहारात येऊ शकलेले नाही. संतांचे विचार पुढे नेण्याची जवाबदारी अनुयायांची आहे. अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले, सामान्य माणसाला देव्हारा कळतो. जे मिळते ते घेणे याला उच्चतम व्यवहार म्हणतात. संत साहित्य हे देव्हाऱ्यात राहू नये असे वाटत असले तर त्याचा जास्तीत जास्त प्रसार झाला पाहिजे.