भाजपा आणि काँग्रेसचा नव्हे, मी तर तेलंगणाचा एजंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:26 AM2018-12-06T05:26:45+5:302018-12-06T05:27:14+5:30
जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे.
- धनाजी कांबळे
हैदराबाद : जनतेसाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भाजपा किंवा काँग्रेसचा मी एजंट कधीच नव्हतो आणि नाही, मी केवळ तेलंगणाच्या जनतेचा एजंट आहे. विकासालाच माझे प्राधान्य आहे, असे टीआरएसचे नेते के. चंद्रशेखर राव म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केसीआर हे भाजपचे एजंट असल्याचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केसीआर हे काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप केला होता.
त्या आरोपांना उत्तर देताना चंद्रशेखर राव यांनी भाजप व काँग्रेसचा समाचार घेतला. सूर्यापेठमधील कोडद येथे प्रचारादरम्यान ते बोलत होते. आम्ही केवळ तेलंगणाच्या विकासाचा विचार करतो. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना आम्ही २४ तास मोफत वीज देतो. भाजपाची जर १९ राज्यांमध्ये सत्ता आहे, तर त्यांना असे का जमत नाही? केवळ वल्गना करण्यात आणि फुशारकी मारण्यात तरबेज असलेल्या भाजपा नेत्यांकडून कोणतीच अपेक्षा करता येत नाही. ते शेतकरी विरोधी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
हीच अवस्था काँग्रेसचीही आहे. त्यामुळे तेलंगणातील जनता विकासालाच साथ देईल, आणि त्याचे प्रतिबिंब ११ डिसेंबरला सगळ््यांनाच दिसेल, असा विश्वासही केसीआर यांनी व्यक्त केला. भाजपाकडे पुन्हा मतदारांपर्यंत जाण्यासाठी कोणताच विकासाचा मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेसमोर जाण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा राजकीय पटलावर आणला जात आहे, असे केसीआर म्हणाले. तर टीआरएसचे दुसरे नेते राम प्रसाद यांनीही योगी सरकारवर टीकास्र सोडले. उत्तर प्रदेशातील जनता भाजपवर प्रचंड नाराज असून, यांना सत्तेवर बसवून आम्ही चूक केली, अशी येथील प्रत्येकाची भावना आहे, असे राम प्रसाद म्हणाले.
काँग्रेसची वॉर रुम
केसीआर यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने सोशल मीडिया टीम तयार केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवरून मतदारांपर्यंत पोचण्याची मोहीम सुरु केली आहे. जवळपास ६ हजार ग्रुपमधून दररोज दीड लाख लोकांपर्यंत पोहोचून प्रचार केला जात आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवून आपली भूमिका मांडली जात आहे. हैदराबादमध्ये याचे मध्यवर्ती कार्यालय स्थापन केले आहे. काँग्रेसचे ५५ निष्ठावान कार्यकर्ते या टीममध्ये आहेत. मदनमोहन राव हे या वॉर रुमचे प्रमुख आहेत. भाजपने देशभर जी स्ट्रॅटेजी वापरली, तीच स्ट्रॅटेजी तेलंगणात वापरली जात आहे. याच सोशल मीडिया टीमने काँग्रेसच्या नेत्या व यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हिंदीतील भाषणाचा व्हिडिओ तयार करून, तो राज्यातील मतदारांपर्यंत सोशल मीडियामार्फत पाठवला आहे.
>योगी अंगठा छाप; अकबरुद्दीन ओवेसी यांनी घेतला खरपूस समाचार
तेलंगणात सत्ता आल्यास ओवेसींना निजामांसारखे पळवून लावू, असे म्हणणाºया योगी आदित्यनाथ यांचा अकबरुद्दीन ओवेसी यांनी खरपूस समाचार घेतला आहे. योगी तु्म्ही अंगठा छाप आहात, जर सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते की निजाम पळून गेले नव्हते. ही भाषा योगींची नाही तर मोदींची आहे, असा प्रतिहल्ला ओवेसींनी चढवला.
निजाम पळून गेले होते, या योगींच्या या वक्तव्यावर ओवेसी म्हणाले की, ‘योगी तुम्ही अंगठा छाप आहात. तुमचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे.
तुम्ही सुशिक्षित असता तर तुम्हाला माहीत असते, की निजाम सोडून पळाले नव्हते. तर त्यांना भारत सरकारने राज्यपाल केले होते. जेव्हा चीनशी युद्ध झाले, त्यावेळी निजामांनी देशाला सोने दान केले होते. त्याबद्दल भारत सरकारने नंतर त्यांचे कौतुकही केले होते. पण तुम्ही म्हणता निजाम पळून गेले होते. ही तुमची नव्हे, तर मोदींची भाषा आहे.’