कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:21 AM2021-06-17T06:21:36+5:302021-06-17T06:22:08+5:30
दोन महिन्यांपासून फरपट : लोकांच्या मदतीवर काढले दिवस. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही.
अलीगढ (उत्तर प्रदेश) : कोरोना महामारीचा फार मोठा तडाखा रोजंदारी मजूर लोकांना बसला. उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक कुटुंबांची उपासमार झाली. सरकारने केलेल्या मदती मर्यादा आहेत. अलीगढ येथील महिला (४२) आणि तिची पाच मुले दोन महिन्यांपासून उपाशी असल्यामुळे त्यांना मलखान सिंह जिल्हा रुग्णालयात भरती करावे लागले आहे.
या महिलेची मोठी विवाहित मुलगी व तिच्या पतीला हा प्रकार समजल्यावर त्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. लेक व जावयाचीदेखील आर्थिक ओढाताणच आहे. रुग्णालयात भरती केल्यावर त्यांनी एका एनजीओला फोन केल्यावर ती संस्था रुग्णालयातच आली व तिने या कुटुंबाला मदत केली.
या सहा जणांना कोणाकडून अधूनमधून जेवण दिले जायचे. गेल्या दहा दिवसांपासून या कुटुंबाला काहीच खायला मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रकृती बिघडली. नंतर त्यांना महिलेची मुलगी व स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात भरती केले गेले.
या महिलेचा पती दोन महिन्यांपूर्वी गंभीर आजारामुळे मरण पावला. तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची खाण्याची आबाळ होत आहे. घर चालवण्यासाठी तिने एका कारखान्यात चार हजार रुपये वेतनाची नोकरीही सुरू केली. लाॅकडनमध्ये कारखाना बंद पडल्यावर तिला कुठेच काम मिळाले नाही. घरातील धान्यही संपले. मग या कुटुंबाला लोकांनी दिलेल्या अन्नावर दिवस काढावे लागले. लॉकडाऊन संपल्यावर या कुटुंबातील मुलाने (२०) मजुरी सुरू केली. ज्या दिवशी काम त्या दिवशी रेशन मिळत होते. काम नसले की कुटुंबाची उपासमार व्हायची. महिलेला चार मुले आणि मुलगी आहे, मुलगी १३ वर्षांची, मोठा मुलगा २०, दुसरा १५, तिसरा १० आणि सर्वात लहान मुलगा पाच वर्षांचा आहे.
तिघांची प्रकृती चिंताजनक
मलखानसिंग जिल्हा रुग्णालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. अमित म्हणाले की, “महिला आणि तिच्या पाच मुलांनी गेल्या दहा दिवसांपासून काहीही खाल्ले नाही, परिणामी त्यांची प्रकृती खूपच खराब आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठीक नसून तीन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.”