"प्रारंभीच्या दिवसांत सगळ्यांनाच देता येईल इतके लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:15 AM2020-12-04T03:15:20+5:302020-12-04T03:15:50+5:30
लसीच्या आपत्कालीन वापरासाठी वर्षअखेरीस परवानगी मिळणार;
नवी दिल्ली : देशात काही कोरोना प्रतिबंधक लसींच्या अंतिम चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या प्रारंभी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी औषध नियंत्रकांकडून परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ही परवानगी मिळाल्यानंतर ती लस सर्वसामान्य जनतेला देण्यास प्रारंभ होईल. लसीचा दर्जा, सुरक्षिततेची खात्री करून घेतली जाईल. सध्या काही लसींच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यांत ७० ते ८० हजार स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. लस टोचल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याचे आढळून आले नाही. चेन्नईमधील एका रुग्णाला लसीमुळे दुष्परिणाम भोगावे लागल्याच्या चर्चेत तथ्य नाही, असेही डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.
ते म्हणाले की, लसीचा साठा करण्यासाठी देशामध्ये शीतगृहांच्या साखळीचा व अन्य सुविधांचा विकास करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रारंभीच्या दिवसांत सगळ्यांनाच देता येईल इतके लसीचे डोस उपलब्ध होणार नाहीत, पण प्राधान्यक्रम ठरवून विविध गटांना लस दिली जाणार आहे.
लस भारतात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
भारतातही लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत, असे फायझरने म्हटले आहे.
बनावट लसीची भीती जगभरातील गुन्हेगारी टोळ्या बनावट कोरोना लसी तयार करून बाजारपेठेत आणण्याची शक्यता आहे असा इशारा इंटरपोलने सर्व देशांना दिला आहे.