जेट एअरवेज बंद पाडण्यात ‘एतिहाद’चा तर हात नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 03:03 IST2019-05-03T03:02:33+5:302019-05-03T03:03:00+5:30
जेट एअरवेज बंद पाडण्यामागे गुंतवणूक करणाऱ्या एतिहाद एअरवेज आणि अन्य एका खाजगी विमानसेवा कंपनीची भूमिका तर नाही ना?

जेट एअरवेज बंद पाडण्यात ‘एतिहाद’चा तर हात नाही?
मुंबई : जेट एअरवेज बंद पाडण्यामागे गुंतवणूक करणाऱ्या एतिहाद एअरवेज आणि अन्य एका खाजगी विमानसेवा कंपनीची भूमिका तर नाही ना? बोली लावण्यात होणाऱ्या दिरंगाईमागे कटकारस्थान तर नाही ना? अशी शंका व्यक्त करून जेट एअरवेज वैमानिक संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एतिहादच्या भूमिकेबाबत चौकशी करण्याचे साकडे घातले आहे.
जेट एअरवेज वैमानिकांच्या संघटनेने पंतप्रधानांना लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केल्याने एतिहाद एअरवेजची भूमिका पहिल्यांदाच चौकशी घेण्यात आली आहे. एतिहाद एअरवेजने गुंतवणूक केलेल्या एअरबर्लिन, अलिटालिया या कंपन्या जशा बंद पडल्या त्याच प्रकारे जेट एअरवेजही बंद पडली. जेट एअरवेज बंद पाडण्यामागे एतिहादचा सहभाग किती आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. जेट एअरवेज बंद पाडण्यामागे मोठे कटकारस्थान आहे की काय? स्टेट बँक आणि एतिहाद कंपनीचे संगनमत तर नव्हते ना? याचा छडा लावण्यासाठी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशीचे आदेश द्यावेत, अशी आमची आग्रहाची विनंती आहे, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर नॅशनल एव्हिएअर्स गिल्डचे अध्यक्ष कॅप्टन करण चोप्रा यांची सही आहे.
या आरोपाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एतिहाद कंपनीला पाठविण्यात आलेल्या ई-मेलला उत्तर मिळालेले नाही.