एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:59 AM2023-09-12T11:59:11+5:302023-09-12T11:59:30+5:30
Ladakh : भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.
जम्मू - भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.
लडाखमध्येचीनने मोठा भूभाग बळकाविला आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्याबद्दल बी. डी. मिश्रा म्हणाले, मी कोणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, भारताची एकही इंच जमीन कोणीही हडपलेली नाही हे वास्तव आहे. ती स्थिती स्वत: डोळ्याने पाहिली असल्याने त्याबद्दल मी खात्रीने सर्वांना सांगू शकतो. १९६२च्या युद्धामध्ये जे झाले तो स्वतंत्र इतिहास आहे. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेतली तर भारताच्या ताब्यात असलेला कोणताही भूभाग कोणीही बळकाविलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मिश्रा हे निवृत्त ब्रिगेडिअर आहेत. तीन दिवसीय चर्चासत्रासाठी ते जम्मू येथे आले आहेत. (वृत्तसंस्था)
‘लष्करी उत्पादनांत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्राधान्य’
- लष्करी उत्पादन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याला देशाने प्राधान्य दिले आहे. भारत हा जागतिक नेता बनण्यासाठी ती पहिली पायरी आहे, असे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी सांगितले.
- nजम्मू आयआयटीच्या वतीने आयोजित नॉर्थ टेक या परिषदेत ते बोलत होते. सीमा भागात ड्रोनच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी भारताने योग्य हालचाली केल्या आहेत, असेही द्विवेदी यांनी सांगितले.
पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी
- लडाखमधील पर्यटनस्थळांचा आणखी विकास तसेच इंटरनेट जाळ्याचा विस्तार करावा तसेच रेस्ट हाउस बांधण्यासाठी जमीन द्यावी, अशा मागण्या लडाखच्या सीमेवर असलेल्या गावांतील नागरिकांनी केल्या आहेत.
- केंद्रीय गृह खात्यातील सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव अतुल दुल्लू यांनी नुकताच लडाखच्या सीमा भागातील चुशूलसहित काही गावांचा दौरा केला. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या.