दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:59 AM2022-09-13T05:59:34+5:302022-09-13T05:59:51+5:30

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले.

Not every hospital death is due to medical negligence - Supreme Court | दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

Next

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : वैद्यकीय सेवेचे योग्य ज्ञान नसल्यामुळे, काल्पनिक गृहितकावर हॉस्पिटलमधील प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत दिल्लीतील एका मृताच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यात नुकसानभरपाई म्हणून ७ कोटी आणि मानसिक त्रासासाठी ३ कोटी रुपये मागण्यात आले होते. तिचा आरोप होता की, तिने पतीला उलट्या होत असल्यामुळे रुग्णालयात आणले. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा उलट्या झाल्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. यानंतर रुग्णाच्या अंगावर पेटके उठले (गोळे आले) आणि तो बेशुद्ध पडला. घरच्या लोकांना कॅज्युअल्टी वॉर्डमधून अत्यंत वाईट वागणूक देत बाहेर काढण्यात आले. नंतर रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ७० टक्के ब्लॉकेज असल्याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करूनही हृदयरोगतज्ज्ञांना बोलाविण्यात आले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णाला आयसीयूमध्ये हलविण्यात आले आणि त्यानंतर १ वाजता मृत घोषित करण्यात आले.

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर टीमने रुग्णावर योग्य उपचार केले, परंतु रुग्णाला वाचविता आले नाही. रुग्णाला मळमळ आणि ॲसिडिटीसाठी इंजेक्शन देण्यात आले होते आणि ईसीजी चाचणी करण्यात आली होती. ईसीजीमध्ये सूक्ष्म बदल दिसून आले. ड्युटीवरील निवासी हृदयरोगतज्ज्ञाने हे पाहिले व तात्काळ जेष्ठ डॉक्टरांना तातडीने कळविण्यात आले. नंतर रुग्णाला श्वासोच्छवासाचा तीव्र त्रास झाला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डाॅक्टरांनी सर्व प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले आणि रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने  दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही याचिका फेटाळली. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे आदेश कायम ठेवत अपील फेटाळले.

कोणत्या प्रकारची योग्य वैद्यकीय काळजी घेतली नाही, हे सूचित करणारा कोणताही विशिष्ट पुरावा जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत न्यायालयाला डॉक्टरांच्या वैद्यकीय निर्णयावर आक्षेप घेणे शक्य होणार नाही. पुरेसे वैद्यकीय ज्ञान नसताना, काल्पनिक गृहितकावर, रुग्णालयातील प्रत्येक मृत्यूला तो वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला, असे म्हणता येणार नाही. - न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, ए. एस. बोपण्णा आणि जे. बी. परडीवाला

Web Title: Not every hospital death is due to medical negligence - Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.