राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याइतका मुर्ख नाही, पण मोदींच्या मौनामुळे दु:ख - प्रकाश राज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 09:30 AM2017-10-03T09:30:47+5:302017-10-03T09:49:19+5:30
प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे.
बंगळुरु - अभिनेता प्रकाश राज यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. आपले पुरस्कार परत करण्याइतका मी मुर्ख नाही असं प्रकाश राज बोलले आहेत. सोमवारी प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आपले पाचही राष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची धमकी दिली आहे असं वृत्त आलं होतं. प्रकाश राज यांनी स्पष्टीकरण देत आपण गौरी लंकेश हत्येप्रकरणी पंतप्रधान मोदींनी मौन बाळगल्याने दुखी आहोत, मात्र आपण पुरस्कार परत करणार असल्याचं बोललो नव्हतो असं सांगितलं आहे.
प्रकाश राज यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, 'प्रकाश राज यांनी आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे अशा बातम्या पाहून मी फक्त हसू शकतो. आपले राष्ट्रीय पुरस्कार परत करेन इतका मी मुर्ख नाही. हे पुरस्कार मला माझ्या कामासाठी देण्यात आले आहेत, ज्याचा मला गर्व आहे'.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन बाळगल्याने आपण दुखी: आहोत हे पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. प्रकाश राज बोलले आहेत की, 'गौरी लंकेश यांची हत्या साजरा करणा-यांना पंतप्रधान मोदी फॉलो करतात हे फार दु:खद आहे'.
What's said...n what's not said. For all out there .. thank you pic.twitter.com/zIT7rnkFxb
— Prakash Raj (@prakashraaj) October 2, 2017
'गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांची हत्या कोणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यांची हत्या कोणी केली याचा तपास करण्यासाठी पोलीस, एसआयटी आहे. हत्येचा आनंद कोण साजरा करत आहे हे फक्त आपण पाहू शकतो. एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्यानंतर आनंद साजरा होत आहे हे पाहून माझ्यासारख्या व्यक्तीला दुख: होतं. माझा प्रश्न आहे की अशा लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करतात आणि यावर कोणतीच भूमिका घेत नाहीत. साधं या घटनेवर ते भाष्यही करत नाहीत. अशा परिस्थितीत या देशाचा एक नागरिक म्हणून मला खूप दु:ख होतं', असं प्रकाश राज बोलले आहेत.
'आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, या देशाचा एक नागरिक म्हणून पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतो', असं प्रकाश राज यांनी स्पष्ट केलं.