लाच न दिल्याने खेळाडूला धावत्या रेल्वेतून ढकलले
By admin | Published: July 25, 2015 01:55 AM2015-07-25T01:55:55+5:302015-07-25T01:55:55+5:30
रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून ढकलल्यामुळे एका २७वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना
लखनौ : रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून ढकलल्यामुळे एका २७वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राव रेल्वे स्थानकावर गुरुवारी घडली.
होशियारसिंग असे मृत खेळाडूचे नाव आहे. गुरुवारी होशियारसिंग हा कासगंज-मथुरा पॅसेंजरमधून आपली आई, पत्नी आणि १० महिन्यांच्या मुलासह प्रवास करीत असताना ही घटना घडली. होशियारसिंगचा मृत्यू कसा झाला, याबद्दल अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि होशियारसिंग हा आपल्या आजारी पत्नीला भेटण्यास पॅसेंजरच्या महिला डब्यात गेला असताना रेल्वे पोलिसांनी त्याला रोखले आणि २०० रुपयांची लाच मागितली. होशियारसिंगने लाच देण्यास नकार दिल्यावर रेल्वे पोलिसांनी त्याला धावत्या रेल्वेमधून खाली ढकलून दिले, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पाठवि-ण्यात आलेले आहे आणि खेळा-डूच्या मृत्यूची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले. ‘पोलीस डब्यात आले व महिला डब्यात काय करतोस असे विचारल्यानंतर पोलिसांनी माझ्या पतीला धावत्या रेल्वेतून ढकलले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, असा दावा होशियारसिंगच्या पत्नीने केला.सदर घटना कशी घडली हे सांगताना होशियारसिंगचा धाकटा भाऊ मुनेशकुमारसिंग म्हणाला, ‘आम्ही सर्व कुटुंबीय कासगंज जिल्ह्याच्या पटियाली ब्लॉक येथे एक कार्यक्रम आटोपून मथुरेतील आपल्या घराकडे परत येत होतो. दुपारच्या वेळी आम्ही पॅसेंजरमध्ये बसलो. महिला नवजात बालकासह महिला डब्यात बसल्या आणि माझा भाऊ सामान्य डब्यात बसला. माझ्या वहिनीला अचानक घेरी आल्याने आईने भावाला फोन केला. त्यामुळे भाऊ सिकंदरा राव स्थानकावर डब्यातून उतरला आणि वहिनीला बघण्यासाठी महिला डब्यात चढला. तो डब्यात चढल्यावर दोन रेल्वे पोलिसांनी त्याला रोखले. पत्नी आजारी आहे. तिला एकदा बघू द्या, अशी विनवणी भावाने केली. पण पोलिसांनी त्याचे काहीही ऐकले नाही आणि डब्यात चढल्याबद्दल २०० रुपयांची लाच मागितली. माझ्या भावाने लाच देण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी त्याला धावत्या रेल्वेतून ढकलले.