हिंदू दहशतवादी नव्हे, तर संघी दहशतवादी- दिग्विजय सिंह
By admin | Published: June 21, 2017 09:03 PM2017-06-21T21:03:03+5:302017-06-21T21:35:02+5:30
हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवादाची सगळीकडेच चर्चा आहे. तत्कालीन यूपीए सरकारवर "हिंदू दहशतवाद" हा शब्द रूढ केल्याचा आरोप हरियाणा सरकारमध्ये मंत्रिपदी असलेल्या अनिल वीज यांनी केला आहे. हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही, असंही अनिल वीज म्हणाले होते. त्याला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हिंदू नव्हे, तर संघी दहशतवादी असतात, असं वादग्रस्त वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.
2006 ते 2008 या दोन वर्षांच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला होता. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचंही नाव पुढे आलं होतं. तसेच या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा आरोप करण्यात आला होता.
तत्पूर्वी अनिल वीज म्हणाले होते, समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटादरम्यान पाकिस्तानातील जे लोक पकडण्यात आले, त्यांना सोडून देण्यात आलं होतं. त्याच वेळी हिंदुस्थानातील लोकांना पकडून "हिंदू दहशतवाद" असं नाव देण्यात आलं होतं. काँग्रेस सरकारनं मतांच्या राजकारणासाठी हा खेळ केला होता आणि काँग्रेसच्याच सांगण्यावरून त्यावेळी त्या पाकिस्तानी नागरिकांना सोडण्यात आलं होतं. काँग्रेसला राजकीय पातळीवर भारतात हिंदू दहशतवाद असल्याचं सिद्ध करायचं होतं. मात्र हिंदू कधीच दहशतवादी होऊ शकत नाहीत. जर हिंदू दहशतवादी असते तर पूर्ण जगात दहशतवाद नसता, दहशतवाद एव्हाना संपला असता. अनिल वीज यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ब-याचशा दहशतवादी हल्ल्यात मुस्लिम सामील होण्याच्या कारणास्तव काँग्रेस सरकार हिंदू दहशतवाद समोर आणू पाहत होते, असा आरोपही अनिल वीज यांनी केला आहे.
#WATCH: A Hindu cannot be a terrorist, no term like "Hindu terrorism" says Haryana Minister Anil Vij pic.twitter.com/Ff8ULbD3P3
— ANI (@ANI_news) June 21, 2017