मला तर पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं, महागाईची झळ बसतच नाही - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 07:56 AM2018-09-16T07:56:24+5:302018-09-16T08:46:49+5:30
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
जयपूर - दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे. ''पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे काहीही फरक पडत नाही'', असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. डिझेल आणि पेट्रोल मोफत मिळत असल्यानं वाढत्या दरांबाबत जास्त विचार करत नसल्याचंही आठवले यांनी म्हटले आहे.
(इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 19 पैशांनी महागलं)
नेमके काय म्हणालेत रामदास आठवले?
''पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल'', असे वक्तव्य रामदास आठवले यांनी शनिवारी जयपूर येथे केले. ''पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता होरपळतेय, ही बाबदेखील मान्य आहे. इंधनाच्या वाढणाऱ्या किमती कमी करणं, हे सरकारचं कर्तव्य आहे'',असेही यावेळेस आठवले यांनी म्हटले.
दररोज वाढत चाललेल्या डिझेल व पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. इंधन दरवाढीमुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडत आहे. अशातच ''पेट्रोल-डिझेल मोफत मिळतं असल्यानं महागाईची झळ बसतच नाही'', असे विधान रामदास आठवले यांनी करुन सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याची टीका होऊ लागली आहे.
I'm not suffering from rising fuel prices as I am a minister. I may suffer if I lose my ministerial post. It's understandable that people are suffering from rising fuel prices & it's the duty of the govt to reduce them: Union Minister Ramdas Athawale in Jaipur #Rajasthan. (15.09) pic.twitter.com/H4F7e7Zhqt
— ANI (@ANI) September 15, 2018
दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणाले होते. पण हे सर्व काही प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्न जनता उपस्थित करत आहे.
महागाईनं जनता हैराण
तर दुसरीकडे, इंधन दरवाढ आणि महागाईचे विघ्न दिवसेंदिवस वाढत जात आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाल्यानं पेट्रोलचा दर प्रति लिटर 89.29 रुपये एवढा झाला आहे तर डिझेल 19 पैशांनी महागल्यानं एक लिटर डिझेलमागे 78.26 रुपये मोजावे लागणार आहेत.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत.
(कॉर्पोरेट पे करम, पब्लिक पे सितम!)
दिल्लीतही पेट्रोलचे दर 28 आणि डिझेलचे दर 18 पैशांनी वधारले आहेत. इंधनाचे दर वाढल्यानं माल वाहतूक महागली आहे. त्यामुळे सर्व वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. महागाईचा जबरदस्त फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. इंधनाच्या दरांमध्ये कपात करण्यात यावी. याबाबत सरकार काय करत आहे?, कुठे आहेत अच्छे दिन?, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.