केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 08:23 AM2024-01-21T08:23:27+5:302024-01-21T08:23:37+5:30

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे.

Not just idols, but the re-establishment of people's faith and belief, said that UP CM Yogi Adityanath | केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

केवळ मूर्तीच नव्हे, तर लोकांची आस्था अन् विश्वासाची पुन:प्रतिष्ठा

-याेगी आदित्यनाथ

शेकडो वर्षांची प्रतीक्षा, अनेक पिढ्यांचा संघर्ष आणि पूर्वजांच्या व्रताचे साफल्य. सनातन संस्कृतीचे प्राण रघुनंदन राघवन रामलल्ला आपल्या जन्मभूमीत अवधपुरीतील भव्य अशा नव्या मंदिरात सिंहासनाधिष्ठित होताहेत. ५०० वर्षांनंतर आलेल्या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण भारत आज भावव्याकूळ झालेला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष रामभूमीकडे असून प्रत्येक रस्ता श्रीरामजन्मभूमीकडेच येत आहे. डोळ्यांत आनंदाचे अश्रू आणि जिभेवर रामनाम. सारा देश राममय झाला आहे. देशाला या दिवसाचीच तर प्रतीक्षा होती. याची वाट पाहत कित्येक पिढ्या निजधामाला गेल्या. आज केवळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नसून लोकांची आस्था आणि विश्वासाची पुन:प्रतिष्ठा होत आहे.

न्याय आणि सत्याचा हा विजय भूतकाळातील कटू स्मृती पुसून टाकून नवी कथा लिहित आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा महायज्ञ केवळ सनातन आस्था आणि विश्वासाच्या परीक्षेचाच काळ नव्हता, तर संपूर्ण भारताला एकात्मतेच्या सूत्रात बांधताना त्याने सामूहिक चेतना निर्माण केली. एखाद्या देशातील बहुसंख्य समाजाने आपल्या आराध्य देवतेच्या जन्मस्थळी मंदिर बांधण्यासाठी इतकी वर्षे आणि इतक्या पातळीवर लढाई करावी हे जगातले कदाचित पहिलेच अनोखे उदाहरण असेल. समाजातल्या सर्व जातीपातींनी, सर्व थरातील लोकांनी राम डोळ्यांसमोर ठेवून काम केले. संतांनी आशीर्वाद दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्यासारख्या संघटनांनी आखणी करून लोकांना एकत्र आणले व संकल्प सिद्धीस गेला.

पृथ्वीवरील अमरावती आणि भूमीवरील वैकुंठ म्हणवल्या जाणाऱ्या अयोध्येला शेकडो वर्षे शाप भोगावा लागला. ज्या देशात रामराज्य आदर्श म्हणून स्वीकारले गेले, त्याच देशात श्रीरामांना अस्तित्वाचे प्रमाणपत्र द्यावे लागले, साक्षीपुरावे समोर ठेवावे लागले. मात्र, श्रीरामाचे जीवनच मर्यादेची शिकवण देते. त्यातूनच रामभक्तांनी धीर सोडला नाही. मर्यादा उल्लंघली नाही. आमच्या व्रताची पूर्णाहुती देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन. २२ जानेवारी २०२४ हा माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा दिवस.

श्रीरामजन्मभूमीमुक्तीच्या संकल्पातूनच मला पूज्य गुरुदेव महंत अवैद्यनाथ यांचे सान्निध्य लाभले. प्राणप्रतिष्ठेच्या या क्षणाला माझे गुरू ब्रह्मलीन महंत श्री दिग्विजय नाथ आणि अवैधनाथ महाराज तसे इतर संतगणांचा आत्मा नक्कीच संतुष्टी पावेल. ज्या संकल्पाला माझे गुरुजन आजीवन जोडलेले होते त्याच्या सिद्धीचा मी साक्षी होत आहे हे माझे सौभाग्य होय. प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वांनाच या दिवसाची प्रतीक्षा आहे. या समारंभात श्रीरामलल्लांच्या समोर पंतप्रधान १४० कोटी भारतीयांच्या भावनेचे प्रतिनिधित्व करतील. अयोध्येत भारताच्या लघु रूपाचे दर्शन होईल.

उत्तर प्रदेशच्या २५ कोटी लोकांच्या वतीने अयोध्याधामात मी सर्वांचे अभिनंदन करतो. प्राणप्रतिष्ठेनंतर जगभरातील रामभक्त, पर्यटक, संशोधक, जिज्ञासूंचे अयोध्येत स्वागत होईल. त्यासाठी अयोध्यापुरीत सर्व व्यवस्था केली जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, विस्तारित रेल्वे स्टेशन, चारही दिशांना चार-सहा पदरी रस्ते, कनेक्टिव्हिटी, हेलिपोर्ट, सुविधायुक्त हॉटेल्स सगळे उपलब्ध करून देण्यात आले आहे. संस्कृती संवर्धन, पर्यटनाला प्रोत्साहन आणि रोजगारालाही त्यातून संधी मिळेल. श्रीरामजन्मभूमी मंदिराची स्थापना भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे आध्यात्मिक अनुष्ठान असून हे राष्ट्र मंदिरच आहे. अवधपुरीत श्रीरामलल्ला विराजमान होणे ही भारतात रामराज्याच्या स्थापनेची उद्घोषणा आहे. सब नर करही परस्पर प्रीती। चलही स्वधर्म निरत श्रुति नीती| ही परिकल्पना प्रत्यक्षात आली आहे.  आम्हाला आनंद आहे, मंदिर तेथेच उभे राहिले, जेथे ते बांधण्याची शपथ घेतली होती.

Web Title: Not just idols, but the re-establishment of people's faith and belief, said that UP CM Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.