कब्रस्तानसाठी नव्हे तर भाजपा मंदिरांसाठी खर्च करतेय जनतेचा पैसा - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:41 AM2021-11-04T09:41:23+5:302021-11-04T09:43:43+5:30

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही केली.

Not Kabristan, BJP Using Public Money For Temples: Yogi Adityanath | कब्रस्तानसाठी नव्हे तर भाजपा मंदिरांसाठी खर्च करतेय जनतेचा पैसा - योगी आदित्यनाथ

कब्रस्तानसाठी नव्हे तर भाजपा मंदिरांसाठी खर्च करतेय जनतेचा पैसा - योगी आदित्यनाथ

Next

अयोध्या : भाजपा सरकार लोकांचा पैसा कब्रस्तानसाठी जागा खरेदीवर खर्च करत नाही, तर मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि सुशोभीकरणावर खर्च करत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील आधीच्या सरकारांवर निशाणा साधला. तसेच, उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या भव्य दीपोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी राम कथा पार्क येथे पोहोचलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांना पुढील वर्षी होळीपर्यंत मोफत रेशन मिळेल, अशी घोषणाही यावेळी केली.

कोविड-19 महामारीच्या वेळी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना या वर्षी नोव्हेंबरमध्ये संपत होती, परंतु सरकारने ती पुढील वर्षी होळीपर्यंत म्हणजेच मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महामारी अजून संपलेली नाही, हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. दरम्यान, या योजनेंतर्गत लोकांना गहू, तांदळासह मीठ, साखर, डाळी आणि तेल मिळणार आहे. उत्तर प्रदेशातील 15 कोटी लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 661 कोटी रुपये खर्चाच्या 50 विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर प्रदेशात निवडणुका होणार आहेत.

'2023 पर्यंत तयार होईल राम मंदिर'
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू असून ते 2023 पर्यंत तयार होईल. यासोबतच केंद्र सरकार उत्तर प्रदेशातील 500 मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करत आहे. यातील 300 हून अधिक ठिकाणांचे काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित ठिकाणांचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.

'31 वर्षांपूर्वी कारसेवकांवर गोळीबार'
मागील सरकारांवर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले म्हणाले, "तुम्हाला आठवत असेल की 31 वर्षांपूर्वी 30 ऑक्टोबर 1990 आणि 2 नोव्हेंबर 1990 रोजी या अयोध्येत रामभक्त आणि कारसेवकांवर गोळीबार झाला होता. त्यावेळी 'जय श्री राम' ची घोषणा देणे आणि मंदिरासाठी आवाज उठवणे हा गुन्हा मानला जात होता, पण लोकशाहीची ताकद किती मजबूत असते, याची जाणीव तुम्ही करून दिली. जे 31 वर्षांपूर्वी रामभक्तांवर गोळीबार करत होते, ते या लोकशाहीच्या बळावर आज तुमच्यासमोर नतमस्तक झाले आहेत. अजून काही वर्षे असेच चालत राहिलो तर पुढच्या कार सेवेसाठी त्या लोकांचे संपूर्ण कुटुंब रांगेत उभे असलेले दिसेल. जेव्हा पुढची कारसेवा होईल, तेव्हा गोळी चालणार नाही, तर रामभक्तांवर कृष्णभक्तांवर फुलांचा वर्षाव होईल, ही लोकशाहीची ताकद आहे."

अखिलेश यादव यांच्यावर आनंद स्वरुप शुक्ला यांचा निशाणा
दुसरीकडे, उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. यादव यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून संरक्षण मिळत असून त्यातून त्यांना आर्थिक मदत मिळत असल्याचा दावा शुक्ला यांनी केला आहे. आयएसआयच्या सांगण्यावरून अखिलेश जिनांचा गौरव करत असल्याचा दावा शुक्ला यांनी केला. दरम्यान, रविवारी सरदार पटेल यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त हरदोई येथील एका जाहीर सभेत अखिलेश यादव यांनी कथितरित्या म्हटले होते की, "सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना यांनी एकाच संस्थेत शिक्षण घेतले आणि बॅरिस्टर झाले. तसेच, त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली आणि संघर्षातून कधीही मागे हटले नाही."

Web Title: Not Kabristan, BJP Using Public Money For Temples: Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.