भारत सोडणार नव्हतो, भविष्यातही सोडणार नाही - आमीर खान
By admin | Published: November 25, 2015 04:29 PM2015-11-25T16:29:31+5:302015-11-25T16:54:13+5:30
माझा किंवा माझी पत्नी किरण हिचा भारत सोडून कुठेही जाण्याचा विचार नसल्याचे आमीर खानने स्पष्ट केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - माझा किंवा माझी पत्नी किरण हिचा भारत सोडून कुठेही जाण्याचा विचार नसल्याचे आमीर खानने स्पष्ट केले आहे. याआधीही भारत सोडण्याचा विचार आम्ही केला नव्हता आणि भविष्यातदेखील कधी करणार नाही असे आमीरने स्पष्ट केले आहे.
जे कोणी माझ्या विरोधात आहेत, त्यांनी माझी मुलाखत नीट पाहिलेली नसावी किंवा ते माझी वाक्यं चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत असंही आमीर म्हणाला आहे. भारत माझा देश आहे आणि इथे जन्माला आल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो असं सांगणा-या आमीरने मी मनापासून जे बोललो त्याच्यावर वाईट प्रतिक्रिया देणारे माझं म्हणणं योग्य असल्याचा दाखला असल्याचं म्हटलं आहे. जे कोणी मला देशद्रोही म्हणत आहेत, त्यांना मी भारताचा अभिमानी असल्याचंच सांगेन आणि त्यासाठी मला इतरांच्या प्रशस्तीपत्राची गरज नसल्याचंही आमीरने म्हटलं आहे.
आमीरने त्याचं म्हणणं चित्तो जेथे भोयशून्यो या मन हे भयमुक्त असावं या रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेनं पूर्ण केलं आहे.
दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना गेल्या सहा ते आठ महिन्यांत घडलेल्या घटनांचा दाखला देताना किरणने भारत सोडण्याचा विषय काढल्याचे आमीरने म्हटले आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पूर लोटला.
काँग्रेसने मोदीसरकारच्या काळात असहिष्णूता वाढत असल्याचा दाखला म्हणून हे विधान वापरलं तर आमीर असं विधान जाहीरपणे ते ही भाजपाचे मंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत करू शकतो हे सहिष्णू वातावरणाचे लक्षण असल्याचे सांगितले. तर अनेक आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांची मजल आमीरने खुशाल भारत सोडावा ते घरवापसी करावी असे सांगण्यापर्यंत गेली. आमीरच्या या खुलाशानंतर हे वादळ चहाच्या पेल्यातलं ठरावं अशी अपेक्षा आहे.