बिहार निवडणुकीपर्यंत 'मन की बात' नकोच - महाआघाडीची मागणी
By admin | Published: September 16, 2015 11:53 AM2015-09-16T11:53:06+5:302015-09-16T11:54:50+5:30
बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १६ - बिहारमधील निवडणूक संपेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी महाआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. यासंदर्भात महाआघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. मात्र मोदींच्या मन की बातवर बंदी घालणे अशक्य असल्याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर आकाशवाणीवर मन की बात हा कार्यक्रम सुरु केला असून याव्दारे मोदी देशवासियांशी संवाद साधतात. मोदींच्या या कार्यक्रमावर काँग्रेस व बिहारच्या महाआघाडीतील जदयू, राष्ट्रीय जनता दलाच्या पक्षाच्या नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या मतदारांवर प्रभाव टाकू शकतात असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होते व म्हणूनच मन की बातवर बंदी टाकावी अशी काँग्रेसची मागणी आहे. काँग्रेसच्या या मताशी जदयू व राजदच्या नेत्यांनीही सहमती दर्शवली आहे. महाराष्ट्र व दिल्ली निवडणुकीच्या वेळीही विरोधकांनी मोदींच्या मन की बात कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता.