मोदी नाही! भाजपाचे नेते ईडी-सीबीआयचा दुरूपयोग करतायत; ममता बॅनर्जी अचानक पलटल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 11:43 PM2022-09-19T23:43:27+5:302022-09-19T23:44:12+5:30
केंद्रीय तपास यंत्रणांच्या अत्याचाराविरोधात विधानसभेतील ठरावावर त्या बोलत होत्या.
केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात प. बंगालच्या विधानसभेत आज ठराव संमत करण्यात आला. या संस्थांचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मात्र क्लिन चिट दिली आहे. ममता अचानक पलटल्याने विरोधकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
भाजपाच्या नेत्यांचा एक गट ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांना आपल्या फायद्यासाठी वापर करून घेत आहे, असा आरोप ममता यांनी केला. यात मला मोदींचा हात आहे, असे वाटत नाही असे त्या म्हणाल्या. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अत्याचाराविरोधात विधानसभेतील ठरावावर त्या बोलत होत्या. सध्याचे केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. हा ठराव कोणत्याही विशिष्ट व्यक्तीविरोधात नसून केंद्रीय यंत्रणांच्या पक्षपाती कारभाराविरुद्ध आहे.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारचा अजेंडा आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध एकत्र येणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन पंतप्रधानांना केले. भाजपने या ठरावाला विरोध केला. विधानसभेत प्रस्तावाच्या बाजूने १८९ तर विरोधात ६९ मते पडली. सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय एजन्सी राज्यातील अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत ज्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत. यामुळे बंगाल सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आहे.