केवळ पुस्तकी ज्ञान नको, शिक्षण क्षेत्रात भारताला मोठा पल्ला गाठायचा आहे: बिल गेट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:25 AM2017-11-18T02:25:34+5:302017-11-18T13:50:49+5:30
मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई : मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ आणि भारतातील आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात देणग्या देणारे समाजसेवक बिल गेट्स यांनी भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
भारतातील शिक्षण क्षेत्रावर सावध टीका करताना बिल गेट्स म्हणाले, भारताविषयीचे माझे मत तसे सकारात्मक असले तरी येथील शिक्षण व्यवस्थेबाबत मात्र मी फार निराश आहे. ही शिक्षण व्यवस्था अधिक चांगली असायला पाहिजे. मला त्यावर टीका करायची नाही. परंतु मला त्याबाबत ब-याच चांगल्या अपेक्षा आहेत.’
तथापि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याच्या संदर्भात आपल्या तूर्तास कोणत्याही योजना नाहीत, असे गेट्स यांनी स्पष्ट केले. आरोग्य क्षेत्राकडून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याकडे वळणार काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ‘आपण सर्वच काही करू शकत नाही. भारतातील बहुतांश समाजसेवकांनी शिक्षण क्षेत्र निवडले आहे आणि त्याचा मला आनंद आहे,’ असे ते म्हणाले.
केवळ पुस्तकी ज्ञान बाळगण्याची प्रवृत्ती चांगली नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘मागील दोन दशकात भारताने मोठी भरारी घेतली आहे. विकासाचे चांगले संकेत मिळत आहेत. परंतु या उपलब्धीचा योग्य फायदा करण्याची आणि आपल्या मानव विकास निर्देशांकाचा परिपूर्ण वापर करण्याची गरज आहे. हे सर्व काही केवळ दर्जेदार शिक्षणामुळे घडेल आणि भारताच्या विकासाचा चढता आलेख कायम राखण्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.’
बालकांना त्यांच्या लहान वयात केवळ चांगले आरोग्य आणि पोषणहार देणेच गरजेचे नाही तर त्यांना चांगले शिक्षणदेखील दिले गेले पाहिजे. शिक्षणामुळे मोठे झाल्यावर त्यांची कमावण्याची क्षमताही वाढेल. या संदर्भात बरेच काही करण्याची गरज आहे. परंतु या क्षेत्रात भारताला अद्याप मोठा पल्ला गाठावयाचा आहे, असे बिल गेट्स म्हणाले.