फक्त चांद्रयान-मंगळयानच नाही...ISRO ने देशाच्या अर्थव्यवस्थेत दिले ₹ 5 ट्रिलियनचे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 07:40 PM2024-11-14T19:40:52+5:302024-11-14T19:41:32+5:30
इस्रोने विविध मोहिमांवर फक्त पैसे खर्च केला नाही, तर अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देऊन परतफेड केली आहे.
ISRO : देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारताला अंतराळ क्षेत्रात प्रगती करण्यासाठी खूप खडतर प्रवास करावा लागला. त्याकाळी अविकसित देश असलेल्या भारतातील लोकांना दोनवेळचे जेवण मिळत नव्हते, अशा काळात अंतराळ क्षेत्रात पुढे जाणे खूप अवघड गोष्ट होती. पण, ISRO ने एक-एक पाऊले टाकत आपला प्रवास सुरू केला आणि आज इस्रो जगभरातील टॉपच्या अंतराळ संस्थांमध्ये सामील आहे.
आज जेव्हा आपण इस्रोच्या कामगिरीकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की, भारताने एक देश म्हणून किती प्रगती केली आहे. इस्रोने आतापर्यंत चांद्रयान, मंगळयान, सूर्ययान..यांसारखी अनेक यशस्वी मोहिमा पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमा पार पाडण्यासाठी इस्रोने फक्त पैसे खर्च केला नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 5 ट्रिलियन रुपयांचे योगदानही दिले आहे.
1 रुपये खर्च करून 2.5 रुपये कमावले
नुकताच इस्रोच्या योगदानाबाबत 'सामाजिक आर्थिक प्रभाव विश्लेषण' आयोजित करण्यात आला होता. त्याचा अहवाल समोर आल्यावर इस्रोशी संबंधित अनेक अनोखे तथ्य समोर आले आहेत. इस्रोवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, संस्थेने आपल्या मोहिमांवर आणि संशोधनावर जेवढा खर्च केला, त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार, इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, ISRO ने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयासाठी 2.5 रुपये परतावा दिला आहे.
सोमनाथ म्हणतात, “चंद्रावर जाणे खूप खर्चीक काम आहे. यासाठी आम्ही केवळ सरकारच्या निधीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे स्पेस सेक्टरच्या व्यवसायात आपल्याला स्थान निर्माण करावे लागेल, जेणेकरून आपण या क्षेत्रात टिकून राहू."
जीडीपीला 5 ट्रिलियन दिले
इस्रोचा 'सामाजिक-आर्थिक प्रभाव विश्लेषण' अहवाल नुकताच केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रसिद्ध केला आहे. हा अहवाल दर्शवितो की, भारताच्या अंतराळ उद्योगाने 2014 ते 2024 दरम्यान GDP मध्ये $60 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी किंवा रु. 5 ट्रिलियन) योगदान दिले आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अंतराळ क्षेत्रामुळे $1 चा गुणक प्रभाव $2.54 होता.
गुणक प्रभावाची गणना विशेषतः पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी केली जाते. यामध्ये सरकार किती खर्च करत आहे आणि याचा अर्थव्यवस्थेला वेगवेगळ्या प्रकारे किती फायदा होत आहे, हे पाहते. उदाहरणार्थ, सरकारने रस्ता बांधला, तर किती लोकांना रोजगार मिळाला, मालमत्तेचे मूल्य किती वाढले, इंधनाची अर्थव्यवस्था किती सुधारली आणि किती लोकांचे जीवन बदलले, अशा अनेक घटकांची गणना केली जाते. हे त्याचे एकूण गुणक प्रभाव दर्शवते.