पंतप्रधानपदाची बिलकूल इर्ष्या नाही, संघाचीही तशी योजना नाही - गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:00 AM2019-03-11T05:00:10+5:302019-03-11T05:00:30+5:30
'मी स्वप्ने पाहात नाही, लॉबिंगही करत नाही'
नवी दिल्ली : पंतप्रधान होण्याची मला बिलकूल इर्ष्या नाही वा पंतप्रधानपदासाठी प्रसंगी माझे नाव पुढे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कोणतीही योजना नाही, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते व वरिष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नि:संदिग्धपणे स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पंतप्रधानपदासाठी पक्षातर्फे आपले नाव पुढे केले जाऊ शकते, या राजकीय वर्तुळातील अटकळींना गडकरी यांनी ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पूर्णविराम दिला. मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही, असे ठामपणे सांगत ते म्हणाले की, अथक काम करत राहणे हाच माझा मंत्र आहे. मी किंवा रा. स्व. संघ यांच्यासाठी देश सर्वोच्च आहे. त्यामुळे पंतप्रधानपद माझ्या मनात नाही किंवा संघाचाही तसा कोणताही विचार नाही. ‘मै त चला जिधर चले रस्ता. जो काम दिखा, करता गया’, हा माझा स्वभाव आहे, असे सांगून गडकरी पुढे म्हणाले,राजकारणात किंवा काम करताना मी कधी गणिते मांडली नाहीत किंवा उद्दिष्टे ठरविली नाहीत. मी स्वप्ने पाहात नाही. मी कोणाकडे (काही मागायला) जात नाही किंवा कोणतेही लॉबिंग करत नाही. मी या स्पर्धेत (पंतप्रधानपदाच्या) नाही मी मनापासून सांगत आहे.
लोक काय विचार करतात ते मला माहित नाही. पण ते जो विचार करतात त्याच्याशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले. मोदीजी उत्तम काम करत आहेत व मी स्वत: आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आमच्या सरकारने केलेले काम पाहता यावेळी मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला (रालोआ) गेल्या निवडणुकीपेक्षा नक्की जास्त जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून ‘महागठबंधन’च्या नावाने एकत्र येण्याचे विरोधकांचे प्रयत्न ही ‘महामिलावट’ आहे, असा टोला त्यांनी लगावला. पंतप्रधानपदाच्या स्पर्षेत असण्याविषयीच्या अटकळींना गेल्या महिन्यात गडकरींनी‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, असे संबोधले होते. विरोधकांमध्येही ते लोकप्रिय आहेत, असे म्हटल्यावर गडकरी म्हणाले होते की, माझ्याकडे जो कोणी येतो त्याला मी होता होई तो मदत करत असतो!
या कारकिर्दीत काही कामे पूर्ण न झाल्याची मला खंत नाही. सतत काम करत राहणे हे माझे तत्त्व आहे. जे काही करता येण्यासारखे होते तेवढे मी केले. कोणीही परिपूर्ण नसतो व तसे कोणी मानूही नये. प्रत्येकाने सतत काम करत राहावे.
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री