रस्ता नव्हे हा तर राज्याच्या विकासाचा राजमार्ग
By admin | Published: January 1, 2016 02:07 AM2016-01-01T02:07:48+5:302016-01-01T02:07:48+5:30
देशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
देशभर भव्य महामार्गांची वेगाने निर्मिती हा केंद्र सरकारचा अग्रक्रम आहे. त्याला अनुसरून तयार होणारा, दिल्ली- डासना- मेरठ एक्स्प्रेस हायवे केवळ रस्ता नव्हे, तर उत्तर प्रदेशच्या विकासाचा राजमार्ग ठरणार आहे. कालांतराने हा राजमार्ग लखनौपर्यंत पुढे नेण्यात येईल. महामार्गापासून १00 कि.मी.च्या व्यासात जितकी गावे आणि शहरे येतील, विकासाची तुफान घोडदौड तिथे सुरू होईल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले.
दिल्ली-मेरठ या ७४ कि.मी. अंतराच्या १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासप्रसंगी पंतप्रधान बोलत होते. नोएडा सेक्टर ६२ मध्ये आयोजित या भव्य सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक परिवहनमंत्री नितीन गडकरींनी केले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह मोदी मंत्रिमंडळातले अनेक मंत्री कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. वर्षअखेरीला दिल्ली, गाझियाबाद, नोएडा व मेरठवासीयांना या विस्तीर्ण महामार्गाची अपूर्व भेट मोदी सरकारने दिली. अडीच वर्षांत हा महामार्ग तयार झाल्यानंतर, ज्या दिल्ली, मेरठ अंतरासाठी सध्या ३ तास प्रवास करावा लागतो ते अंतर अवघ्या ४0 मिनिटांत पार करता येईल.
शिलान्यास सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत वाजपेयींच्या स्वप्नांचे स्मरण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर नेण्याचे स्वप्न पंतप्रधान असताना वाजपेयींनी पाहिले. चार महानगरांना जोडणारा सुवर्ण चतुष्कोन, भारताच्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम सीमा जोडणारे भव्य कॉरिडॉर्स निर्माण करण्याचे काम त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले. ग्रामीण भारतातल्या गावांचीही वाजपेयींना चिंता आहे. मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणारे रस्ते तयार करण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजना त्यांनी सुरू केली. त्यानंतर दहा वर्षांत काय झाले आणि काय नाही, याचा हिशेब सांगण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की, वाजपेयींच्या स्वप्नांना गती देण्याचे काम आता माझ्या सरकारने सुरू केले आहे. त्यात सर्वाधिक प्राधान्य पायाभूत सुविधांचा विकास आणि महामार्गांच्या निर्मितीला आम्ही दिले आहे. दिल्ली, मेरठ १४ लेन एक्स्प्रेस हायवेच्या शिलान्यासाच्या निमित्ताने भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरींनी उत्तर प्रदेशसह साऱ्या देशाला सुखद धक्का देणाऱ्या अनेक घोषणा आपल्या प्रास्ताविकात केल्या.
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा सरकारचा निर्णय
अतिवृष्टीनंतरच्या महापुरात या राज्यातली काही गावे आणि बद्रिनाथ केदारनाथपर्यंतचा बहुतांश रस्ता वाहून गेला होता.
परिवहन मंत्रालयाने आता दिल्लीपासून बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमनोत्रीपर्यंतच्या एक हजार कि.मी.च्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या क्षेत्रात वारंवार होणाऱ्या भूस्खलनाचा धोका यापुढे उद्भवणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची ग्वाही गडकरींनी दिली.
वाहतूक कोंडीच्या समस्येतून राजधानी दिल्लीची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ व २४ चे १४ लेनपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणाही यावेळी गडकरींनी केली.
शिलान्यास सोहळा व त्यानंतरच्या जाहीर सभेसाठी सुमारे ५0 हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता.