संघ प्रचारक नव्हे, पंतप्रधानांसारखे वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2015 12:12 AM2015-04-18T00:12:48+5:302015-04-18T00:12:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर चालविलेल्या टीकेमुळे काँग्रेस चांगलीच संतापली आहे.

Not a Sangh campaigner, but like a Prime Minister | संघ प्रचारक नव्हे, पंतप्रधानांसारखे वागा

संघ प्रचारक नव्हे, पंतप्रधानांसारखे वागा

Next

काँग्रेसचा मोदींना सल्ला : जिथे जाल, तिथे प्रतिवाद करण्याचा इशारा
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर चालविलेल्या टीकेमुळे काँग्रेस चांगलीच संतापली आहे. याच नाराजीतून, विदेशी भूमीवर संघ प्रचारक म्हणून नव्हे, तर पंतप्रधानांसारखे वागा, असा सल्ला काँग्रेसने मोदींना दिला आहे. यापुढे परदेशात जिथे कुठे जाल, तिथे आम्ही तुमच्या खोटेपणाचा पर्दाफाश करू, असा इशाराही यानिमित्ताने काँगे्रसने मोदींना दिला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी शुक्रवारी मोदींना जोरदार लक्ष्य केले. विदेश दौऱ्यात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून खोटे बोलून मोदींनी पंतप्रधानपदाची व भारताची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. काँग्रेस याची निंदा करते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आधीचे सरकार आणि विद्यमान विरोधकांना लक्ष्य करणे, त्यांच्यावर टीका करणे, हे पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाही, असे शर्मा म्हणाले. यापुढे मोदी जगाच्या पाठीवर जिथे कुठे जातील, तिथे काँग्रेस नेत्यांना पाठवण्यात येईल. मोदींनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून काँग्रेस व संपुआ सरकारच्या कारभारावर केलेल्या टीकेला हे नेते त्याक्षणीच पत्रपरिषद घेऊन उत्तर देतील, असे शर्मा यांनी यावेळी जाहीर केले. मोदींनी गुरुवारी टोरंटो येथे भारतीय समुदायासमोर केलेल्या भाषणात काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले होते. काही लोक घाण करून गेलेत, मी ती साफ करणार आहे. घोटाळ्यांचा देश ही भारताची प्रतिमा बदलून कौशल्यपूर्ण देश अशी देशाची नवी प्रतिमा घडवणार, असे मोदी म्हणाले होते.
भारताला कॅनडाकडून यावर्षीच्या उत्तरार्धात मिळणार युरेनियम
ओटावा : भारताशी युरेनियम पुरवठ्याचा करार करणारी कॅनेडियन कंपनी ‘कॅमिको’ यावर्षीच्या उत्तरार्धात त्याचा पुरवठा सुरू करणार असून त्याच्या वापरावर कडक निगराणी ठेवण्यात येणार आहे. कंपनी या कराराबाबत उत्साहित असून ही दोन्ही देशादरम्यानच्या नव्या संबंधांची सुरुवात असल्याचे कंपनीने म्हटले.

४कॅनडाच्या दौऱ्यावर येणारे गत ४२ वर्षांतील आपण पहिले भारतीय पंतप्रधान असल्याचा दावा मोदींनी केला. हे धादांत खोटे आहे. जून २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग कॅनडाच्या दौऱ्यावर गेले होते आणि उभय देशांनी संयुक्त निवेदनही जारी केले होते. कदाचित हे मोदींना ठाऊक नसेल, असा चिमटाही आनंद शर्मा यांनी काढला.

Web Title: Not a Sangh campaigner, but like a Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.