४०० वर्षांपासून गावात नाही एकही बाळंतपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:10 AM2018-05-13T01:10:02+5:302018-05-13T01:10:02+5:30
मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात असलेल्या सांका श्यामजी या गावात गेल्या ४०० वर्षांत एकाही महिलेचे बाळंतपण झालेले नाही.
राजगढ (मध्यप्रदेश) : मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यात असलेल्या सांका श्यामजी या गावात गेल्या ४०० वर्षांत एकाही महिलेचे बाळंतपण झालेले नाही. गावकरी सांगतात की, देवाने शाप दिल्यामुळे गावात आजही कुणा महिलेचे बाळंतपण होत नाही. महिला व मूल सुखरूप रहावे यासाठी एकाही महिलेचे बाळंतपण गावात होऊ दिले जात नाही. अर्थात या गावांतील महिलांना मुले होत नाहीत, असा मात्र त्याचा अर्थ नाही.
गावचे सरपंच नरेंद्र गुर्जर सांगतात की, गावातील महिलांची ९० टक्के बाळंतपणे गावाबाहेरील रुग्णालयातच होतात. काही कारणास्तव वा आपत्कालीन स्थिती ओढवली तरीही बाळंतपण गावाबाहेर केले जाते. यासाठी गावाबाहेर खास खोलीही बांधली आहे. गावात एक दंतकथा प्रचलित आहे. गावातील बुुजुर्ग सांगतात की, १६ व्या शतकात गावात एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी एका महिलेने गहू दळण्याचे काम सुरू केले. या दळण्याने मंदिराचे बांधकाम करणारे मजूर विचलित होऊ लागले व कामात व्यत्यय येऊ लागला. याच कारणाने देवाचा कोप झाला आणि देवाने यापुढे गावात एकही महिला
कुणाला जन्म देऊ शकणार नाही, असा शापच दिला.
हा पायंडा पाळणारे गावकरी मात्र याला अंधश्रद्धा मानत नाहीत. जेव्हा काही कारणास्तव गावात महिलेचे बाळंतपण झाले, तेव्हा ते मूल मरण पावले किंवा बेढब मूल जन्माला आल्याचे आम्ही पाहिले आहे, असा दावा गावकरी करतात.
एका वयोवृद्ध गावकऱ्यांनी असेही सांगितले की, देवाची कृपा असल्यामुळेच गावात कुणीही दारू पित नाही किंवा मांसभक्षण करीत नाही.