२0१९ मध्ये भाजपाविरोधी पक्षांची आघाडी होईलच, याची खात्री नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:21 AM2018-06-30T05:21:43+5:302018-06-30T05:21:46+5:30
कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : कर्नाटकातील जनता दल व काँग्रेस यांच्या सरकारमध्ये कुरबुरी सुरू झाल्यानंतर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी विरोधी ऐक्याबाबतच साशंकता व्यक्त केली आहे. आपले पुत्र कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले, याचा अर्थ ते एकत्रित निवडणुका लढवतीलच, असे नाही, असे देवेगौडा यांनी म्हटले आहे.
कुमारस्वामी यांच्या सरकारपुढे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या आव्हान उभे करीत असून, संपूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या कुमारस्वामी यांचा निर्णयही सिद्धरामय्या यांना अमान्य आहे. त्यामुळे धर्मशाळामध्ये त्यांनी आपल्या काही समर्थकांना बोलावूनही घेतले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या पक्षाला गृहित धरू नये, असा इशाराही माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी दिला आहे.
आमचे काँग्रेसशी मतभेद आहेतच. तरीही आम्ही एकत्र येऊ न लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांत अजिबातच चर्चा झालेली नाही. मात्र, कुमारस्वामी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसून, त्याबाबत निर्णय घेतली, असे सांगून, त्यांनी २0१९ मध्ये दोन पक्षांची आघाडी कायम राहतील, असे संकेत दिले, तसेच भाजपाप्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नसलेल्या पक्षांच्या नेत्यांनी आपण भेटणार आहोत, असेही देवेगौडा यांनी स्पष्ट केले.
सर्वत्र आघाडी अशक्यच
मे महिन्यात बंगळुरूमध्ये झालेल्या कुमारस्वामी यांच्या शपथविधीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, तेलुगू देसम, भाकप अशा अनेक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यातून विरोधी ऐक्याचे दर्शन घडले होते. पण त्यानंतर निवडणुकांबाबत चर्चा झालेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल व डावे पक्ष एकत्र येणे अशक्य आहे, केरळमध्ये डावे पक्ष व काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार, हे निश्चित आहे.
पंजाब, दिल्लीतही आप व काँग्रेस परस्परांविरोधातच लढतील. युपीत सपा व बसपा हे पक्ष एकत्र आले तरी ते काँग्रेसला फार जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे २0१९ मध्ये भाजपाच्या विरोधात सर्वत्र आघाडी होणे अशक्यच दिसते.
उत्तर प्रदेश : लोकसभेसाठी सपा व बसपा यांच्यात प्रत्येकी ४0 जागा लढविण्यावरून चर्चा सुरू आहे.
पश्चिम बंगाल : तृणमूल व काँग्रेस एकत्रितपणे लोकसभा निवडणुका लढतील, असे दिसत आहे.
महाराष्ट्र : काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र यायच्या
तयारीत असले तरी त्यांचा निर्णय व्हायचा आहे.
आंध्र प्रदेश : तेलगू देसम व तेलंगणातील तेलंगणा राष्ट्रीय समिती यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही.