नोटबंदी - एका दिवसात नरेंद्र मोदींना 3 लाख टिवटरकरांचा जय महाराष्ट्र
By admin | Published: November 11, 2016 12:51 PM2016-11-11T12:51:28+5:302016-11-11T12:51:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या आणि एकाच दिवशी तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त युजर्सनी मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000च्या नोटा चलनातून बाद केल्या आणि एकाच दिवशी तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त युजर्सनी मोदींना ट्विटरवर अनफॉलो केलं. त्यामुळं मोदींचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही असं दिसून आलंय.
ट्रॅकालिटिक्स या वेबसाईटच्या अभ्यासानुसार 9 नोव्हेंबर या एकाचदिवशी मोदींच्या 3.18 लाख फॉलोअर्सनी त्यांना ट्विटरवर अनफॉलो केलं आहे. मोदींच्या एकूण फॉलोअर्सची संख्या 23.8 दशलक्ष असून भारतामध्ये सगळ्यात जास्त फॉलोअर्स त्यांचे आहेत. सातत्यानं त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत असताना एकाच दिवशी इतकी घट होणे लक्षणीय आहे.
पहिल्या आठ दिवसांत मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत प्रतिदिन 25 हजारांची भर पडत होती, मात्र अचानक ज्यादिवशी मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला, तब्बल 3.18 लाख टिवटरकरांनी मोदींना जय महाराष्ट्र केला.
ज्यावेळी टिवटर फेक अकाउंट डिलीट करतं त्यावेळी साधारणपणे अशी घट होते. पण असं ज्यावेळी होतं त्यावेळी अन्य राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्समध्येही अशीच घट दिसून येते. यावेळी मात्र तसं झालेलं नाही, कारण अरविंद केजरीवाल आणि राहूल गांधींचे फॉलोअर्स वाढले आहेत आणिफक्त मोदींचे फॉलोअर्स घटले आहेत.
टिवटरच्या प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार बनावट अकाउंट्स डिलीट झाल्यामुळे ही घट झाली आहे. तसं नसेल तर भाजपासाठी ही चिंतेची बाब असू शकते. कारण, जर मोठ्या प्रमाणावर लोक नोटबंदीच्या निर्णयामुळे नाराज असतील तर येत्या काळांमधील निवडणुकांमध्ये भाजपाला याचा फटका बसू शकतो.