एटीएममधून खेळण्यातील नोटा
By admin | Published: February 23, 2017 01:36 AM2017-02-23T01:36:35+5:302017-02-23T01:36:35+5:30
एटीएमवर एकाला दोन हजार रुपयांच्या चार नोटा ‘चिल्ड्रेन बँक आॅफ इंडिया’ असे लिहिलेल्या मिळाल्या.
नवी दिल्ली : एटीएमवर एकाला दोन हजार रुपयांच्या चार नोटा ‘चिल्ड्रेन बँक आॅफ इंडिया’ असे लिहिलेल्या मिळाल्या. हा प्रकार येथील संगम विहारमध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर ६ फेब्रुवारी रोजी घडला, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह रोहित कुमार यांना या एटीएमवर दोन हजार रुपयांच्या चार नोटा मिळाल्या. त्यावर अधिकृत वॉटरमार्कच्या जागी ‘चुरण’ लिहिलेले होते. याशिवाय या नोटांवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या स्टॅम्पच्या जागी ‘पीके’ आणि डाव्या वरच्या कोपऱ्यावर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाऐवजी ‘भारतीय मनोरंजन बँक’, असे लिहिलेले होते. रोहित कुमार यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यावर पोलिस उपनिरीक्षकाला त्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी पाठवले असता त्यालादेखील ‘चिल्ड्रेन बँक आॅफ इंडिया’ असे लिहिलेली नोट मिळाली. या प्रकारानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
काही मोजक्याच नोटा असण्याची शक्यता
एटीएमचे फुटेज बघितले असता एटीएममध्ये शेवटी ज्याने पैसे भरले, त्याला पोलिसांनी ओळखले आहे. या आधी अशा कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत.
बहुधा काही मोजक्याच नोटा ठेवल्या गेल्या असाव्यात. नेमक्या कोणत्या वेळी खऱ्या नोटांच्या जागी बनावट नोटा ठेवल्या गेल्या हे आम्हाला तपासायचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.