नोटाबंदीप्रमाणे सर्व काही नष्ट करत जाईल बुलेट ट्रेन - पी. चिदंबरम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 04:00 PM2017-09-30T16:00:34+5:302017-09-30T17:06:02+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटाबंदी व बुलेट ट्रेनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बुलेट ट्रेन ही नोटांबदीप्रमाणेच आहे, मार्गात येणा-या प्रत्येकाला ही बुलेट ट्रेन नष्ट करत जाणार आहे, असे ट्विट पी. चिदंबरम यांनी करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर )मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरुन पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
रेल्वेने बुलेट ट्रेनसारख्या महागड्या प्रकल्पावर काम करण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करून पायाभूत सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. रेल्वे सुरक्षा, पायाभूत सोईसुविधांवर खर्च करायला हवा, असे चिदंबरम म्हणाले. बुलेट ट्रेन सामान्यांसाठी नाही. तर ती उच्च वर्गातील लोकांची अहंकारी यात्रा असेल, असा हल्लाही त्यांनी चढवला. दरम्यान, विरोधी पक्षांप्रमाणे भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिलं आहे. शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. पण, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिलं आहे.आपल्याकडे आहेत त्या गोष्टी होत नाहीत. आणि नवीन गोष्टी सरकारकडून आणल्या जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. मुंबईमधील रेल्वे स्टेशन आणि ट्रेनची परिस्थिती जोपर्यंत सुधारली जाणार नाही तोपर्यंत बुलेट ट्रेनची एकही वीट रचली जाणार नाही, असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.
Bullet train will be like demonetisation. It will kill everything else including safety.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 30, 2017
Bullet train is not for ordinary people. It is an ego trip for the high & mighty.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) September 30, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी 14 सप्टेंबर रोजी बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या बुलेट ट्रेन प्रकल्पावर 1 लाख 10 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही रेल्वे धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एचएसआरसी) ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची वैशिष्ट्यं
1 . बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे. या बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे. हे कर्ज 0.1% व्याज दराने मिळणार आहे. 50 वर्षात हे कर्ज फेडावे लागणार आहे.
2. या प्रकल्पांतर्गत काही ट्रेन जपानहून येणार आहेत तर काही ट्रेन्सची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.
3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मेक इन इंडिया योजनेची ताकद वाढण्यास मदत होईल.
4. तंत्रज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्राचाही यानिमित्तानं विकास होण्यास मदत होईल.
5. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे 24 हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे म्हटले जाते आहे.
6. 1 लाख 8 हजार कोटीं रुपयांच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबई ते अहमदाबादचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 350 कि.मी. वेगाने पूर्ण होईल. महाराष्ट्रातील 156 कि.मी., गुजरातमधील 351 कि.मी. या टप्प्यातून ही ट्रेन धावणार आहे.
7. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रवास सुरू होणार असून ते पुढे ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती असे 12 स्टेशन असतील.
8. या प्रकल्पासाठी 700 हेक्टरहून अधिक जमीन संपादित करण्यात येणार असून, ठाणे-वाशी भागातून 7 किमी समुद्राखालून ही ट्रेन धावणार आहे. याशिवाय ही रेल्वे मुंबईतून 15 किमी भूमिगत मार्गाने जाणार आहे.
9. अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी सध्या 7 ते 8 तास लागतात. मात्र बुलेट ट्रेनमुळे हे केवळ तीन तासांत हे अंतर पार करता येणार आहे.
10. बडोदा शहराजवळ ही रेल्वे ४५ डिग्रीचे वळण घेणार आहे.
बडोद्यात ट्रेनिंग सेंटर
बडोदा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून, ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती, हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने दिली. एनएचएसआरसीचे कार्यकारी संचालक आचल खरे यांनी सांगितले की, नॅशनल अकॅडमी ऑफ इंडियन रेल्वेच्या पाच हेक्टर जमिनीवर केंद्र उभारण्यात येईल. डिसेंबर २०२० पर्यंत हे केंद्र सुरू होईल.