नोटांवर डॉ. आंबेडकर, विवेकानंद यांचे फोटो?
By Admin | Published: January 1, 2016 01:21 AM2016-01-01T01:21:28+5:302016-01-01T01:21:28+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो भारतीय नोटांवर छापण्याची सूचना राष्ट्रीय सल्लागार समितीचे माजी सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञ
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांचे फोटो भारतीय नोटांवर छापण्याची सूचना राष्ट्रीय सल्लागार समितीचे माजी सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
डॉ. जाधव हे संपुआ सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य होते. भारतीय नोटांवर कुणाचे फोटो छापावेत हा उच्चस्तरीय धोरणाचा आणि गंभीर विचारविमर्श करण्याचा मुद्दा आहे. १९९६ पासून सर्व रुपयांवर केवळ महात्मा गांधी यांचाच फोटो छापला जातो. त्याआधी भारतीय नोटांवर अशोक स्तंभाचे चित्र छापण्यात येत होते. आता त्यात बदल करणे हे धोरणात्मक आणि प्रमुख पाऊल ठरू शकते.
डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती समारोहासाठी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय समारोह समितीचे बिगर सरकारी सदस्य असलेले डॉ. जाधव यांनी आपण अशा प्रकारची सूचना केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ‘समितीच्या पहिल्या बैठकीत आपण पंतप्रधानांना ही सूचना केली. अमेरिका आणि ब्रिटनच्या चलनावर अनेक महापुरुषांच्या प्रतिमा आहेत आणि भारतातही अशा महापुरुषांच्या प्रतिमा नोटांवर छापता येऊ शकतात. भारतीय नोटांवर डॉ. आंबेडकर आणि विवेकानंद यांच्यासारख्या अन्य महापुरुषांचे फोटो छापता येतील,’ असे आपण बैठकीत म्हटल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.
नरेंद्र जाधव यांची सूचना
डॉ. नरेंद्र जाधव यांची ही सूचना मान्य करण्यात आली तर भारतीय नोटांवर लवकरच महात्मा गांधी यांच्यासोबत डॉ. आंबेडकर आणि विवेकानंद यांचे फोटो पाहायला मिळतील. आपली ही सूचना मान्य होणार की नाही हे काळच सांगेल; परंतु डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने नुकतेच नाणे जारी केले आहे, याकडे डॉ. जाधव यांनी लक्ष वेधले.