हनीप्रीत, आदित्य इन्सानविरुद्ध नोटीस, पोलिसांचे सावधगिरीचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 04:00 AM2017-09-02T04:00:35+5:302017-09-02T04:01:46+5:30
तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याने दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इन्सान आणि डेराचा मुख्य कारभारी आदित्य इन्सान यांच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची (लूक आऊट) नोटीस हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी दिली
चंदीगढ : तुरुंगात असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याने दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत इन्सान आणि डेराचा मुख्य कारभारी आदित्य इन्सान यांच्याबद्दल सावधगिरी बाळगण्याची (लूक आऊट) नोटीस हरयाणा पोलिसांनी शुक्रवारी दिली. पंचकुलाचे पोलीस आयुक्त ए. एस. चावला यांनी ही माहिती दिली. हनीप्रीत हिच्यावर कोणते आरोप आहेत हे समजले नसले, तरी आदित्य इन्सान याच्यावर देशद्रोहाचे आरोप आधीच दाखल आहेत.
राम रहीम याला २५ आॅगस्ट रोजी न्यायालयाने दोषी ठरविल्यावर त्याची सुटका करण्याचा कट करण्यात आल्याच्या आरोपांचीही चौकशी आम्ही करीत आहोत, असे ते
म्हणाले. ही नोटीस बजावल्यानंतर देशातील विमानतळे, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशनांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. २००२ मध्ये झालेल्या बलात्काराच्या खटल्यात राम रहीम याला तुरुंगवासाची शिक्षा सुनाविली गेलेली आहे. डेराचे दोन मुख्य कारभारी आदित्य इन्सान व धीमन इन्सान यांच्याविरोधात वृत्तपत्राच्या बातमीदाराने केलेल्या निवेदनानंतर पंचकुला पोलीस ठाण्यात यापूर्वीच दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे. धीमन याला गुरुवारी ताब्यात घेण्यात आले.
तुरुंगात वेगळे ठेवले
नवी दिल्ली : राम रहीम याला इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आलेले आहे. राम रहीम याला दोषी ठरविण्यात आल्यानंतर, त्याच्या पाठीराख्यांनी जो हिंसाचार केला, त्यामुळे तुरुंगातील कैदी संतापलेले आहेत. माहिती राम रहीम याच्यासोबत एकाच खोलीत असलेल्या व शुक्रवारी जामिनावर सुटलेल्या कैद्याने दिली आहे. बाबाच्या पाठीराख्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्यामुळे कैदी संतापलेले आहेत.राम रहीम याला वेगळे ठेवले गेले नसते, तर कैद्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता, असे तो कैदी म्हणाला. तो राम रहीमबरोबर सोनारिया (तुरुंगात पाच दिवस एकत्र होता.
राम रहीमचे फोटोे नाल्यांत
जयपूर : राजस्थानच्या श्रीगंगानगर शहरातील तुंबलेल्या काही नाल्यांची पाहणी केली असता, त्यात राम रहीम याचे शेकडो फोटो आढळले. मीरा चौक आणि सुखाडिया सर्कलमधील नाले या फोटोंमुळे तुंबले होते. त्यात १०० पेक्षा जास्त फोटो व राम रहीमची भित्तिपत्रके टाकून दिली होती. हे फोटो आणि भित्तिपत्रके बाबाच्या अनुयायांनी टाकल्याचा अंदाज आहे.